महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपावर चिडलेल्या शिवसेनेला मुनगंटीवारांनी सांगितली भित्र्या सशाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:54 PM2019-11-02T12:54:57+5:302019-11-02T13:03:55+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019: भित्र्या सशाची, भुकेल्या वाघाच्या गोष्टी सांगत मुनगंटीवारांचं शिवसेनेवर भाष्य
मुंबई: शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला आता भाजपानं भित्र्या सशाची गोष्ट सांगितली आहे. शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला कलगीतुरा चर्चेतून संपेल, अशी आशा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला भित्र्या सशासह वाघाचीदेखील गोष्ट सांगितली.
राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं काल मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला. त्यावर बोलताना मी केवळ तांत्रिक बाब सांगितली. सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, यात चूक काय, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मित्रपक्ष वड्याचं तेल वांग्यावर काढत असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.
शिवसेना लवकरच अॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत
शिवसेनेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी बालभारतीमधल्या एका धड्याचा संदर्भ दिला. 'मला बालभारतीच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. भित्र्या सशाची ती गोष्ट होती. झाडाचं एक पान गळून नेमकं सशाच्या पाठीवर पडतं. तेव्हा त्याला आभाळ कोसळल्यासारखं वाटतं आणि तो सैरावैरा पळू लागतो. बालभारतीमधला हा धडा मला आजही आठवतो. बाकीच्यांना तो आठवतो का ते माहीत नाही,' असं सूचक विधान मुनगंटीवारांनी केलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात...
शिवसेना काँग्रेससोबत जाईल का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. शिवसेना, काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी वाघाचं उदाहरण दिलं. वाघ कितीही भुकेला असला, तरीही तो गवत खात नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दूध साखर एकत्र येऊ शकते. पण दूध आणि लिंबू नाही एकत्र येऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना काँग्रेसचा 'हात' धरेल, ही शक्यता फेटाळून लावली.