महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 08:57 AM2019-11-04T08:57:21+5:302019-11-04T09:01:59+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे शाब्दिक बाण; वाढणार महायुतीतला ताण?
मुंबई: विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असूनही शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं नाही. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह सर्वच सत्तापदांची समान वाटणी व्हावी, यावर ठाम आहे. तर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आवश्यक आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील संवाद जवळपास संपुष्टात आला आहे. याउलट एकेमकांवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे तणाव वाढला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपाला लक्ष्य करत आहेत. काल रात्री एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं. 'दोस्ती उन्हीं से बनाओ जो निभाने की औकात रखते हो,' असं राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत 'सामना'सोबतच पत्रकार परिषदांमधून भाजपावर जोरदार टीका करत आहेत.
सत्ता वाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू असताना आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेचे नेते राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती राज्यपालांना देतील. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आमंत्रित करावं, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात येईल. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांनी 145 आमदारांचा पाठिंबा मिळवावा आणि सरकार स्थापन करावं, असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पवार यांनी काल दूरध्वनीवरून सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याचं समजतं.
राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अधिक आणि तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील ते शहा यांच्याशी चर्चा करतील.