महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 10:38 AM2019-11-04T10:38:04+5:302019-11-04T10:38:39+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तरुण भारतवर त्रोटक भाष्य; भाजपावर टीका नाही
मुंबई: राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना, भाजपामधील संवाद जवळपास बंद झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडून दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं भाजपावर शरसंधान साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. मात्र आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या प्रस्तावित भेटीवर भाष्य केलं. राज्यपालांची भेट राजकीय नाही. ती सदिच्छा भेट आहे, असं राऊत म्हणाले. मात्र अशा बैठकांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा होतच असते, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं. 'भगतसिंह कोश्यारी स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आम्ही याआधीही अनेकदा त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतलेलं आहे,' असं राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.
राज्यपालांच्या भेटीत राजकारणावर चर्चा होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर अशा भेटींमध्ये राजकारणावर चर्चा होतच असते. माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं राज्यपालांशी जे बोलायचं आहे ते बोलेन असं राऊत म्हणाले. त्यामुळे राज्यपाल आणि राऊत यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून सातत्यानं होणाऱ्या भाजपावरील टीकेला आज 'तरुण भारत'मधून प्रत्युत्तर देण्यात आलं. संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक असल्याची टीका तरुण भारतनं अग्रलेखातून केली. या टीकेला 'ज्याप्रकारे मुख्यमंत्री सामना वाचत नाही, तसं आम्हीदेखील सामना सोडून काही वाचत नाही,' असं उत्तर राऊत यांनी दिलं. तरुण भारत वृत्तपत्र आहे हेच मला माहीत नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. राज्यपाल भेट आणि तरुण भारतवर बोलणाऱ्या राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर कोणतीही टीका केली नाही.
तत्पूर्वी संजय राऊत यांनी काल रात्री एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं. 'दोस्ती उन्हीं से बनाओ जो निभाने की औकात रखते हो,' असं राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. यासोबतच राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत 'सामना'सोबतच पत्रकार परिषदा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर जोरदार टीका करत आहेत.