महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:33 AM2019-10-31T09:33:14+5:302019-10-31T09:33:42+5:30
Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन 'सामना'
मुंबई: सत्तापदांच्या समान वाटपाची मागणी करत मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचा सूर काल काहीसा नरमला. मात्र आज लगचेच 'सामना'मधून शिवसेनेनं भाजपाला लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेची आणि ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेला कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'मधून टोला लगावण्यात आला आहे.
सत्तापदांचं समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला आणि तो सहमतीनं वापरला. आता एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे 'सत्तापदा'त येत नाही असं कुणाचं म्हणणं असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्यानं लिहावे लागतील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे सत्तापद नाही आणि त्याचं समान वाटप करता येणं शक्य नसेल असं कुणाला वाटत असेल तर त्या बिन 'सत्ते'च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
आम्ही शब्दाला जागतो असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा 'पेच' पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर 'पेच' का पडावा? जे ठरले आहे त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही, पण सध्या धर्मग्रंथावर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार आम्ही घेतला आहे,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.