राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 07:25 AM2019-11-02T07:25:31+5:302019-11-02T07:35:41+5:30

Maharashtra Election Result 2019: मुनगंटीवार यांच्या विधानाचा शिवसेनेकडून समाचार

Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena slams bjp over presidents rule comment | राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

Next

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून गेला असला तरी अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून कलगीतुरा सुरू आहे. राज्यात सात दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यावरुन आता शिवसेनेनं 'सामना'मधून मुनगंटीवारांवर पलटवार केला. सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक विनोदी शोभायात्राच बनली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अशी विनोदी शोभायात्रा झाली असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? सध्याचा गोंधळ म्हणजे 'शिवशाही' नाही. राज्यात सरकार नाहीच, पण मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्रास अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती यांचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला आहे. '7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.' श्री. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील 'भाजप' कार्यालयात पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केला आहे.

राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राच्या आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. प्रश्न इतकाच आहे की महाराष्ट्रात सरकार का बनत नाही याची कारणे कोणी द्यायची? भाजपचाच मुख्यमंत्री पुन: पुन्हा होईल असे ज्यांनी जाहीर केले त्यांनी सरकार स्थापनेचा दावा पेश केला नसेल तर त्यास काय महाराष्ट्राच्या जनतेस जबाबदार धरायचे? सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena slams bjp over presidents rule comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.