महाराष्ट्र निवडणूक निकालः मुंबई-ठाण्यात शिवसेनाच 'मोठा भाऊ'; पश्चिम महाराष्ट्रात दिसली 'पवार पॉवर'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:08 AM2019-10-24T10:08:30+5:302019-10-24T10:09:07+5:30
Maharashtra Election Result 2019 ठाण्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी
मुंबई: पुणे, नाशकात एकही जागा न लढवणाऱ्या, युतीत पहिल्यांदाच भाजपापेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई, ठाण्यानं मोठा हात दिला आहे. राज्यात मोठा भाऊ असलेला भाजपा मुंबई, ठाण्यात मात्र छोटा भाऊ ठरताना दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात होताच शिवसेनेनं मुंबई, ठाण्यात आघाडी घेतली आहे. सध्या शिवसेना राज्यात 70 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे. यामध्ये मुंबई, ठाण्याचा मोठा वाटा आहे.
सध्या मुंबईत भाजपा 15 जागांवर पुढे आहे. तर शिवसेनेनं 16 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत भाजपानं मुंबईत 15 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला 14 जागांवर यश मिळालं होतं. ठाण्यात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यात शिवसेना तब्बल 20 जागांवर पुढे आहे. तर भाजपा 7 मतदारसंघांत आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत ठाण्यात भाजपानं 7, तर शिवसेनेनं 15 जागा जिंकल्या होत्या.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते निवडणुकीच्या आधीत भाजपामध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात पवार पॉवर दाखवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर राष्ट्रवादी पुढे आहे. तर भाजपा 22, तर शिवसेना 12 जागांवर आघाडीवर आहे.