महाराष्ट्र निवडणूक 2019: आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:10 PM2019-11-05T12:10:56+5:302019-11-05T12:11:22+5:30
Maharashtra Election Result 2019: महाभरतीचा संदर्भ देत भाजपावर निशाणा
मुंबई: भाजपानं आमदार फोडूनच दाखवावेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलं आव्हान दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमचे आमदार फोडून तर बघा, असं आव्हान पाटील यांनी भाजपाला दिलं.
राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, शिवसेनेचे आमदारही फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. भाजपानं हा प्रयत्न करून पाहावा. आम्ही त्या ठिकाणी पुन्हा आमचा आमदार निवडून आणून दाखवू, असं पाटील म्हणाले. फोडाफोडीचं राजकारण झाल्यास राष्ट्रवादी काय करेल, हेदेखील त्यांनी सांगितलं. भाजपानं असं पाऊल उचललंच तर आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे उमेदवार देऊ. ज्या पक्षाचा आमदार फोडला जाईल, त्याच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि त्याला इतर सर्व पक्ष पाठिंबा देतील, असं म्हणत फोडाफोडीच्या राजकारणाचा मुकाबला करण्यास राष्ट्रवादी समर्थ असल्याचं म्हटलं.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या घाऊक पक्षांतराचा आणि महाभरतीचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी भाजपाला इशारा दिला. निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक आमदारांना, नेत्यांना भाजपानं पक्षात घेतलं. त्यांचं निवडणुकीत काय झालं, जनतेनं त्यांना कसा धडा शिकवला, हे सगळ्यांनी पाहिलंय, याची आठवण पाटील यांनी भाजपाला करून दिली.
तत्पूर्वी अशाच प्रकारचा इशारा हाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिला होता. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं ट्विट त्यांनी केलं होतं. आमदारांच्या फोडोफोडीच्या शक्यतेवर भाष्य करताना सत्यजित तांबेंनी भाजपाचे नेते उदयनराजे भोसलेंच्या पराभवाचा संदर्भ दिला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला.