महाराष्ट्र निवडणूक निकालः ठाकरे-पवार घराण्यातील तिसरी पिढी सुसाट; आदित्य,रोहित आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:50 AM2019-10-24T08:50:44+5:302019-10-24T08:55:31+5:30
Maharashtra Election Result 2019: वरळीतून आदित्य ठाकरे तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे-पवार घराण्यातील नवीन पिढी यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.
वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे ७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात आघाडीकडून सुरेश माने यांना तिकीट देण्यात आली होती. तर कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार ३ हजार मतांच्या आघाडीवर आहेत. ठाकरे-पवार घराण्यातील तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कर्जत जामखेड आणि वरळी या मतदारसंघाकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
कर्जत जामखेडमध्ये भाजपाचे मंत्री असलेले राम शिंदे हे सध्या पिछाडीवर असल्याने पुढील मतमोजणी राम शिंदे पुढे जातील का हे पाहणे गरजेचे आहे. कर्जत जामखेडमध्ये २०१४ च्या निवडणुकीत ३७ हजार ८१६ मताधिक्यांनी राम शिंदे विजयी झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राम शिंदे या निवडणुकीत बाजी मारणार की रोहित पवार जायंट किलर ठरणार हे काही तासात स्पष्ट होईल.
महाराष्ट्र निवडणूक निकाल लाईव्ह: मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर