महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार कधी स्थापन होणार?; मुख्यमंत्र्यांचं अवघ्या एका शब्दात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 01:39 PM2019-11-03T13:39:37+5:302019-11-03T13:40:21+5:30

Maharashtra Election Result 2019: निकालानंतरच्या 9 दिवसांनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम

Maharashtra Vidhan Sabha Result will form the government very soon says cm devendra fadnavis | महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार कधी स्थापन होणार?; मुख्यमंत्र्यांचं अवघ्या एका शब्दात उत्तर

महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार कधी स्थापन होणार?; मुख्यमंत्र्यांचं अवघ्या एका शब्दात उत्तर

Next

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेताची पाहणीदेखील केली. सरकारकडून शेतकऱ्यांना पूर्ण मदत दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

राज्यात आलेल्या महाचक्रीवादळात मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय 30 ते 40 वर्षानंतर ऑक्टोबरमध्ये पाऊस आल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सोयाबीन, कापूस, ज्वारीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यासाठी 10 हजार कोटींची तरतूद काल जाहीर केली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मदतीचा निर्णय ठरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना आधार देताना शासकीय यंत्रणेनं संवेदनशील राहावं, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. दुष्काळी परिस्थितीत आपण जी मदत करतो, ती सर्व मदत आताही करायची आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीला सामोरं जावं लागू नये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांना राज्यात सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'लवकरच' असं उत्तर त्यांनी दिलं. निवडणुकीच्या निकालाला 9 दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी उद्धव यांना नवा प्रस्ताव पाठवल्याचं समजतं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटू शकतो.

नव्या प्रस्तावात काय?
मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असं आश्वासन नव्या प्रस्तावात देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी. याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशा मागण्या उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांच्याकडून उद्धव यांना हा नवा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result will form the government very soon says cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.