महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर आदित्य ठाकरेंना देणार मदतीचा हात; नितेश राणेंची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 07:23 PM2019-10-24T19:23:45+5:302019-10-24T19:29:24+5:30
Maharashtra Election Result 2019 पुन्हा रंगणार राणे विरुद्ध ठाकरे सामना?
मुंबई: शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. राणे आणि ठाकरे यांच्यातला 'सामना' महाराष्ट्रानं पाहिला आहे. आता राणेंची दुसरी, तर ठाकरेंची तिसरी पिढी विधानसभेत दिसणार आहे. त्यामुळे विधानसभेत राणे आणि ठाकरेंचे एकमेकांवरील 'प्रहार' पाहायला मिळणार का, याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला त्यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिलं.
आदित्य यांच्या रुपात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. त्यांनी वरळीतून मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता आदित्य विधानसभेत दिसतील. विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा संवाद कसा असेल, असा प्रश्न नितेश राणेंना विचारला गेला. त्यावर त्यांना कामकाज शिकायला मी मदत करेन, असं उत्तर राणेंनी दिलं. 'विधानसभेच्या कामकाजाचे काही नियम असतात. संसदीय कामकाजात काही आयुधांचा वापर करावा लागतो. याबद्दलची माहिती मी आदित्य यांना देऊ शकतो. अर्थात त्यांनी मदत मागितली, तरच मी त्यांना सहाय्य करेन,' असं नितेश राणे यांनी सांगितलं.
कणकवलीत भाजपाच्या नितेश राणेंनी जवळपास 30 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव केला. महायुती असतानाही शिवसेनेनं कणकवलीत उमेदवार दिला होता. त्यामुळे कणकवलीतल्या लढतीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीवरळीत 67 हजार मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे आदित्य यांना तब्बल 70 टक्के मतं मिळाली.