पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विधानपरिषदेतील ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 12:50 PM2024-07-28T12:50:39+5:302024-07-28T12:52:00+5:30
MLAs swearing ceremony : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. आज ११ वाजता विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता.
शपथ घेणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांची नावे...
1- पंकजा मुंडे - भाजप
2- योगेश टिळेकर - भाजप
3- अमित गोरखे - भाजप
4- परिणय फुके - भाजप
5- सदाभाऊ खोत - भाजप
6- भावना गवळी - शिंदे शिवसेना
7- कृपाल तुमाने - शिंदे शिवसेना
8- शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
10- प्रज्ञा सातव - काँग्रेस
11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पक्ष
काँग्रेसची ८ मतं फुटल्याची जोरदार चर्चा
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची ८ मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.