Maharashtra Waqf Board Land Case : महाराष्ट्र वक्फ बोर्ड लँड केस; 7 ठिकाणी ED चे छापे, नवाब मलिकांच्या अखत्यारीत येतं मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:10 PM2021-11-11T15:10:47+5:302021-11-11T15:11:55+5:30
ED Raids In Pune Waqf Board Land Case : विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
पुणे - महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी पुण्यातील 7 ठिकाणी छापे टाकले (ED raids). हे प्रकरण वक्फ बोर्डाशी संबंधित असलेल्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात एनसीबी आणि तपास अधिकारी समीर वानखेडे यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत, असा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, आता ईडीने ही कारवाई केली आहे.
ड्रग्स केसमध्ये आता मलिक-फडणवीस आमने-सामने -
तत्पूर्वी, गुरुवारी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. आता या विधानाविरोधात नोटीस पाठवत समीर खान म्हणाले, त्यांच्या घरात ड्रग्ज सापडले नाहीत. यासोबतच त्यांनी फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
तर दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, फडणवीस यांनी आमच्यावर आरोप केले होते की आमच्या घरातून ड्रग्ज सापडले, माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना माफीती मागण्यास सांगितले. त्यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा खटला दाखल केला जाईल.