महाराष्ट्र तापला !
By admin | Published: March 3, 2017 06:14 AM2017-03-03T06:14:22+5:302017-03-03T06:14:22+5:30
होळीनंतर खऱ्या अर्थाने तापणारा महाराष्ट्र आतापासून धुमसायला लागला आहे.
पुणे : होळीनंतर खऱ्या अर्थाने तापणारा महाराष्ट्र आतापासून धुमसायला लागला आहे. आताच अशी गत तर पुढे कसे होणार... अशी धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. त्यातच जागतिक तापमानवाढीमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह देशभरातील १७ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने एकूणच यंदाचा उन्हाळा तापदायक होणार असल्याची चिन्हे आहेत.
विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतील कमाल तापमानात गुरुवारी मोठी वाढ नोंदविण्यात आली. कोकण किनारपट्टी भागातील भिरा हे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले आहे. येथील तापमान
४२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी तापमान नगरमध्ये
१५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात
आले. मात्र, येथील कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांवर आहे. उर्वरित बहुतांश जिल्ह्यातील पारा ३५ अंशांच्या पुढेच असून, किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. भिरापाठोपाठ अकोला दुसरा उष्ण जिल्हा ठरला आहे. येथील कमाल
तापमान ३८.६, तर किमान तापमान
१९.७ अंश सेल्सिअस आहे. विदर्भातील चंद्रपूर व ब्रह्मपुरीचे कमाल तापमान ३८ व किमान तापमान अनुक्रमे १९ व २० अंश सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर आणि मालेगाव जिल्ह्यातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या घरात गेले असून, किमान तापमान अनुक्रमे २० आणि १९च्या घरात आहे. (प्रतिनिधी)
>मुंबईकरांना यंदा उन्हाचे चटके
मुंबईचे कमाल तापमानही
३६ ते ३८ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत असून, वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर चटक्यांमुळे हैराण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील सातएक दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. विशेषत: पूर्व आणि ईशान्य दिशेकडून वेगाने वाहणारे वारे आणि समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या दोन घटकांमुळे कमाल तापमानात वाढ होत असून, उत्तरोत्तर यात भरच पडेल, कुलाबा वेधशाळेने कळविले आहे.
>जागतिक हवामान बदलामुळेच तापमानात वाढ होत आहे.
यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक गरम असेल.
- डॉ. ए. के. सहाय, प्रमुख, हवामान संशोधन विभाग, पुणे वेधशाळा
>६ ते ८ मार्च पावसाची शक्यता
गेल्या आठ- दहा दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल जाणवत आहे. येत्या ६ मार्च ते ८ मार्चच्या दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा पूर्व भाग, सोलापूर, दक्षिण महाराष्ट्राच्या पूर्व भागातील सांगली, सातारा, तर पुण्याच्या पूर्व भागात हवामान बदल घडून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ