राज्यात अखेर गारपीट झालीच; पळविला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:23 AM2022-03-09T06:23:28+5:302022-03-09T06:23:46+5:30

कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकासह खरिपातील ज्वारी, मका पिकांचे नुकसान 

Maharashtra was finally hit by hail; The grass of the mouths of the plundered farmers | राज्यात अखेर गारपीट झालीच; पळविला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

राज्यात अखेर गारपीट झालीच; पळविला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिकला सोमवारी संध्याकाळनंतर झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्यात कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकासह खरिपातील ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी बागलाणसह येवला, मनमाड, पेठ येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील साल्हेर, अंतापूर, जायखेडासह काही भागात गारपीट झाली. दिंडोरी तालुक्यात ओझे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे समाधान पठाडे यांची अडीच एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. निफाड तालुक्यातील विंचूर येथे  रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. पावसाने द्राक्षबागांसह काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. 

नंदुरबार : शहादा तालुक्यात अवकाळी 
शहादा तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी संध्याकाळनंतर वाऱ्यासह गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर पपईची तोड थांबू शकते. 

धुळे : खरीप पिके आडवी
सोमवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. साक्री तालुक्यातील वसमार, म्हसदी आणि धुळे तालुक्यातील शिरधाने प्र. नेर, न्याहळोद परिसरातील कांदा आणि मका पिकांना फटका बसला. शिरधाने प्र. नेर येथे अवकाळी पावसासह गारपीट झाली. 

जळगाव : ५ मिमी पाऊस
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी ढगाळ वातावरण कायम होते. सुदैवाने पावसाने फारसे नुकसान झालेले नाही. ढगाळ वातावरण कायम राहिले तर ज्वारी व मका पिकांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. 
 

Web Title: Maharashtra was finally hit by hail; The grass of the mouths of the plundered farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी