महाराष्ट्रात कुणाची सरशी?, सहा एक्झिट पोलचे वेगवेगळे आकडे, पण सगळ्यांचा कल युतीकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 09:15 PM2019-05-19T21:15:14+5:302019-05-19T21:16:11+5:30
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर प्रचारही थंडावला आहे.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर प्रचारही थंडावला आहे. त्यात आता अनेक संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले असून, यातून निकालांचे कल हाती आले आहेत. या एक्झिट पोलमधून महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल्स घेण्यात आला आहे. एबीपी माझा, ईपसॉस, सी व्होटर, इंडिया टुडे, सकाळ आणि जन की बात या संस्थांच्या सर्वेक्षणावरून हा पोल ऑफ पोल्स काढण्यात आला असून, यात महाराष्ट्रात युतीला 36, तर आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझानं केलेल्या सर्वेक्षणात सेना-भाजपा युतीला 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर आघाडीला 14 जागा मिळू शकतात. ईपसॉसच्या एक्झिट पोलनुसार, युतीला 42-45 जागा मिळण्याची शक्यता असून, आघाडीला 6 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सी व्होटरच्या अंदाजानुसार युतीला 34, तर आघाडीला 14 जागा मिळण्याचा कयास आहे. इंडिया टुडेच्या मते, भाजपा युतीला 38-42 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेस आघालीडाल 6 ते 10 जागा मिळू शकतात. सकाळनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये युतीला 29 तर काँग्रेसला 19 जागा देण्यात आल्या आहेत. तर जन की बातनं केलेल्या एक्झिट पोलमधून युतीला 39-34, आघाडीला 12-8 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल्स काढल्यास त्याला सरासरी युतीला 36, तर आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीची घसरण होणार असून, शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.