महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:51 AM2023-02-27T05:51:58+5:302023-02-27T05:52:22+5:30

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे.

Maharashtra will be heat! Maximum temperature likely to rise in next two days | महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता

महाराष्ट्र होरपळणार! पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढीची शक्यता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढतच असून, याता आता आणखी भर पडणार आहे. कारण, हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र, तेलंगणाच्या बहुतांश भागात, गुजरात, छत्तीसगड, रायलसीमा अनेक भागांवर, ओडिशाअंतर्गत काही भागांसह तामिळनाडू, केरळ येथे कमाल तापमानाची नोंद ३५ ते ३७ सेल्सिअसच्या आसपास होत असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दाेन ते तीन अंशाची भर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघणार आहे.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह लगतच्या भागात कमाल तापमानात कमालीची वाढ होत आहे. थंडीने तर राज्यातून केव्हाच माघार घेतली असली तरी राज्यातील काही ठिकाणी रात्री गारवा आणि दिवसा उन्हाचा तडाखा, असे वातावरण आहे. मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून इथल्या प्रदूषणाने कहर केला असतानाच दुपारी बारा ते दाेनदरम्यान पडणारे ऊन अक्षरश: चटके देत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असून, हवामानातील बदलामुळे मुंबईकर व्हायरल फिव्हरने हैराण झाले आहेत. गुजरातकडून येणारे वारे, पूर्वेकडून वाहणारे वारे समुद्राहून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद आता ३५ अंशाच्या आसपास होत असली तरी होळीनंतर यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Maharashtra will be heat! Maximum temperature likely to rise in next two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.