...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 12:35 PM2023-12-10T12:35:53+5:302023-12-10T12:37:50+5:30
आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.
मुंबई : आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला विरोध करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावे पार पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे काल राज्यातील तिसरा ओबीसी एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. तसंच जरांगे पाटील यांच्या हिंदीतील संभाषणाचा व्हिडिओ दाखवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती व्यक्त केली आहे.
"राज्यात आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे सत्ताधारी गटाने आणि विशेषत: मंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. मराठा-ओबीसी या वादात दोन्हीकडच्या लोकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. असं असताना छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री जरांगे पाटील यांची खिल्ली उडवत मिमिक्री करत असल्याचा एक व्हिडिओ पाहिला. हा प्रकार या राज्याच्या संस्कृतीला अशोभनीय तर आहेच, सोबतच आगीत तेल ओतण्याचा देखील आहे," अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रातील जातीय सलोखा टिकवायचा असेल तर अशा प्रलोभनांपासून दूर राहायला हवं, अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल देखील मणिपूरच्या दिशेने व्हायला वेळ लागणार नाही, असं आव्हाड म्हणाले.
इंदापूरमधील सभेत नेमकं काय म्हणाले भुजबळ?
इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची हिंदीत बोलत असल्याची एक व्हिडिओ क्लिप ऐकवत, त्यांना हिंदी बोलणे जमत नाही, ते अकलेने दिव्यांग झाले आहेत, अशी घणाघाती टीका केली. तसंच ते मला येवल्याचं वेडपट म्हणत आहे. पण जरांगे यांचा जन्म झाला होता का नव्हता, तेव्हा मी महापौर आणि आमदार झालो. तेही दोनदा झालो. जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.