पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 05:17 PM2022-10-11T17:17:20+5:302022-10-11T17:17:54+5:30

Chandrashekhar Bawankule : राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली.

Maharashtra will not accept the torch in the grip of the claw, Chandrashekhar Bawankule target Uddhav Thackeray | पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

googlenewsNext

भंडारा :  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली.

चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खा. सुनील मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, आ. परिणय फुके आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे सहप्रमुख विजय चौधरी उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना राजकीय लाभ होणार नाही. 

मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारत आपल्या पक्षाचे व कार्यकर्त्यांचे प्रचंड नुकसान केले. शिवसेनेचा पक्ष का फुटला? त्या पक्षातून खासदार-आमदार का बाहेर पडले? याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्या पक्षातील घडामोडींना भाजप जबाबदार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भाजपची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाच्या जोरावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची युती आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवेल. आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास करत आहोत. भंडारा हा आपला प्रवासाचा १९ वा जिल्हा आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण भाजपाचा संघटनात्मक प्रवास करणार आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

याचबरोबर, भाजपाने राज्यातील केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून 'धन्यवाद मोदी', अशी लाभार्थ्यांच्या हस्ताक्षरातील पंधरा लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बूथस्तरावर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम चालू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वीस घरांची जबाबदारी देऊन सरकारच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी काम करण्यात येत आहे. तसेच, राज्यभर विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra will not accept the torch in the grip of the claw, Chandrashekhar Bawankule target Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.