उत्तर प्रदेशला हरवून महाराष्ट्र विजेता
By admin | Published: January 1, 2015 11:53 PM2015-01-01T23:53:11+5:302015-01-02T00:16:41+5:30
अपंगांची क्रिकेट स्पर्धा : सारंग लॉपेटो सामनावीर, रवी पाटील मालिकावीर
मालवण : मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर पार पडलेल्या अपंग क्रिकेटपटूंच्या टष्ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशचा पराभव करत जेतेपद पटकावले.
उत्तर प्रदेश संघाने दिलेले १०८ धावांचे आव्हान १६ षटकांत पूर्ण करताना महाराष्ट्रने ५ विकेट राखून दणदणीत विजयाची नोंद केली. विजयी महाराष्ट्र संघाला मान्यवरांच्या उपस्थितीत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून महाराष्ट्राच्या सारंग लॉपेटो याने, तर स्पर्धेतील मालिकावीराचा मान महाराष्ट्राच्या रवी पाटील यांनी पटकावला.
गेले तीन दिवस मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यातील अपंग क्रिकेटपटंूच्या संघांची टष्ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेची रंगत मालवणवासीयांनी अनुभवली.
महाराष्ट्र संघाने साखळीतील दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर उत्तर प्रदेश संघाने हरियाणा विरुद्ध सरस धावगतीच्या जोरावर विजय मिळवित आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. आज, गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाचा विलास नाबाद ३१, हरिबंद २०, राहुल १४ याच्या जोरावर २० षटकांत ८ गडी गमावून १०८ धावा उभारल्या. महाराष्ट्र संघाकडून रवी पाटील याने ४ षटकांत १८ धावा देत २ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करत महाराष्ट्र संघाने सारंग लॉपेटो ३५, रवी पाटील १९, लोकेश १५ यांच्या दमदार फलंदाजीवर ५ गड्यांच्या मोबदल्यात १६ व्या षटकांतच राणे यांच्या विजयी चौकाराने विजय निश्चित केला.
उत्तर प्रदेशच्या पंकज याने ३ षटकांत २४ धावा देत २ गडी बाद केले. तडाखेबंद ३५ धावा करणाऱ्या सारंग लॉपेटो याला सामनावीर किताब देऊन गौरविण्यात आले, तर स्पर्धेत सहा गडी बाद करत आणि ७० धावा पटकावत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या रवी पाटील याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या महाराष्ट्र संघास रोख रुपये ७० हजार व चषक, तर उपविजेत्या संघास ५० हजार रुपये व चषक, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या हरियाणा व कर्नाटक संघांना प्रत्येकी २० हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक वाडेकर, सहदेव बापार्डेकर, संतोष साटविलकर उपस्थित होते. पंच म्हणून दिलीप सावंत, उमेश मांजरेकर, गुणलेखक राहुल परुळेकर, जावेद खान, निखिल वायरकर यांनी काम पाहिले. ग्राऊंडमन प्रकाश पाताडे, पांडुरंग पाताडे, संजय राऊत यांनी काम पाहिले. (वार्ताहर)