विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:34 PM2022-12-19T18:34:08+5:302022-12-19T18:35:21+5:30
''महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भ आणि मराठवाडा कधीही माफ करणार नाही.''
नागपूर: सध्या उपराजधानी नागपूरमध्ये आज(दि.19)पासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule) यांनी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे. तसेच, ''महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भ आणि मराठवाडा कधीही माफ करणार नाही'', अशी प्रतिक्रियाही दिली.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, ''2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लढू. विदर्भात 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणू,'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाल की, ''निवडणुकांबाबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा जो निर्णय असेल, त्याला आमचा आणि भाजपच्या संपूर्ण संघटनेचा पाठिंबा असेल. जिथे एकनाथ शिंदे यांचा उमेदवार उभा असेल, तिथे भाजपची संघटना त्याला मदत करेल. शिंदेंच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची संघटना पूर्ण ताकत लावेल,'' असं बानवकुळे म्हणाले.