Maharashtra winter session 2021 :...तुम्ही, हाॅस्पिटल बांधताय की, ताजमहाल? विधान परिषदेतील त्याच त्या उत्तराने सदस्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:15 AM2021-12-29T06:15:03+5:302021-12-29T06:16:17+5:30
Maharashtra winter session 2021 : ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला.
मुंबई : रखडलेले प्रकल्प, वाढता खर्च आणि शासनाकडून मिळणारी नेहमीची उत्तरे यामुळे मंगळवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला. तर, दशकानुदशके ज्येष्ठ सदस्यांचे महत्त्वाचे प्रश्न सुटत नसतील तर, सभागृह हवेच कशाला, असा संताप किरण सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्यांदाच आमदार बनलेल्या सरनाईकांच्या संतप्त भाषणामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.
निरंजन डावखरे यांनी कौसा रुग्णालयाची उभारणी तसेच उभारणीच्या कामाला लागलेला विलंबासंबंधी लक्षवेधी मांडली होती. यावर, कौसा रूग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या कामासाठी ५४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. पावसाळा वगळून २४ महिन्यांची मुदत कंत्राटदाराला दिली होती.
तसेच या रुग्णालयाच्या ६७.७८ कोटी रूपयांच्या टप्पा दोनच्या प्रस्तावास महापालिकेच्या महासभेने १३ एप्रिल २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत या कामासाठी ५६.१३ कोटी रुपये खर्च झाल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
यावर संतप्त होत, हॉस्पिटल बांधताय की, ताजमहाल, असा प्रश्न डावखरे यांनी उपस्थित केला.
उपसभापतींनी दिला सबुरीचा सल्ला
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कशीबशी चर्चा पूर्ण केली. नवीन आमदार सभागृहात आल्यावर त्यांना रुळायला वेळ लागतो. अनेकदा सभापती त्यांना बोलायला प्रोत्साहन देत असतात. मंगळवारी मात्र किरण सरनाईक यांना आवरण्याची वेळ आली. सभापतींनी शेवटी त्यांना दालनात बोलावून कामकाजाबाबत सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.
सूचना करूनही सरनाईकांची सरबत्ती
राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक मंगळवारी प्रथमच बोलायला उभे राहिले होते. सोमवारी सभागृहात ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात कोकण विकासाचे प्रश्न सोडवता आले नसल्याचे म्हटले होते. तर, आज डावखरे आणि कपिल पाटील यांनी आपापल्या लक्षवेधींचे प्रश्न सुटत नसल्याचे म्हटले.
यावर, भावनावेगात सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना वारंवार शांत राहण्याची सूचना केली. मात्र, सरनाईक शांत व्हायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे प्रश्न सुटत नसतील तर, प्रश्न विचारायचे कशाला, सभागृह हवेच कशाला अशी सरबत्ती सरनाईक यांनी केली.