Maharashtra winter session 2021 : सभागृहात घोरणे निषिद्ध; नो हॅट, नो ओव्हरकोट; आमदारांसाठी आचारसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:24 AM2021-12-29T06:24:57+5:302021-12-29T06:25:19+5:30
Maharashtra winter session 2021 : उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत सभागृहात चर्चा करू नये, असेही या आचारसंहितेत म्हटले आहे.
मुंबई : विधिमंडळात आमदारांच्या वर्तनाबाबत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेनुसार आमदारांना हॅट, ओव्हरकोट घालून सभागृहात येण्यास मनाई आहे. सभागृहात बसल्या-बसल्या घोरणे निषिद्ध असेल.
सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नसलेले वृत्तपत्र सभागृहात वाचण्यास आमदारांना मनाई असेल. आमदारांनी आपसात विनोद करू नये. आपसात बोलू नये. फारच गरज असेल तर हळू आवाजात बोलावे. एकमेकांवर ओरडू नये, असे बजावण्यात आले आहे.
कामकाजात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाजवळ जाणे आणि त्यांचा माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. बाकावर उभे राहण्यास मनाई आहे. एकाच वेळी दोन सदस्यांनी बोलण्यास उभे राहू नये. आपल्या हसण्याचा व बोलण्याचा आवाज सभागृहात जाणार नाही, याची काळजी लॉबीतील आमदारांनी घ्यावी.
आमदारांनी सभागृहात खाद्यपदार्थ आणू नयेत. आपल्या आसनावर कोणताही झेंडा किंवा चिन्ह मांडू नये. कोणतीही जाहिरात होईल असा पोषाख करू नये. सभागृहात धरणे धरू नयेत आणि सभागृहाच्या वेलमध्ये घोषणाबाजी करू नये. सभागृहाच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा अधिकार आमदारांना नसेल. इतर सभागृहांवर आक्षेप घेणे अयोग्य आहे. उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत सभागृहात चर्चा करू नये, असेही या आचारसंहितेत म्हटले आहे.
आमदारांसाठी आचारसंहिता
जाणकारांच्या मते अशी आचारसंहिता आधीपासूनच आहे, पण सदस्यांच्या गैरवर्तनावर चिंता व्यक्त झाल्यानंतर ती नव्याने जारी करण्यात आली. मात्र, या आचारसंहितेत केवळ सभागृहात आमदारांनी कसे वागावे याचाच उल्लेख आहे. ज्या नीतेश राणे यांच्या कथित गैरवर्तनावरून गदारोळ होऊन आचारसंहितेचा विषय ऐरणीवर आला ते गैरवर्तन सभागृहाबाहेर झालेले होते.