Maharashtra winter session 2021 : ... तर शिक्षणाधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - बच्चू कडू; जळगावातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 06:20 AM2021-12-29T06:20:49+5:302021-12-29T06:22:03+5:30
Maharashtra winter session 2021: विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी जळगाव जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०१५ ते २०१९ या कालावधीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला.
मुंबई : जळगाव जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून संबंधित शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी जळगाव जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०१५ ते २०१९ या कालावधीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. संबंधितांवर कोणती कारवाई केली याबाबतची विचारणा दराडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ क्रमांक देण्यामध्ये झालेल्या अनियमिततेच्या चौकशीबाबतीत समिती गठित करण्यात आली आहे, तसेच नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट केलेल्या ३६४ प्रकरणांच्या नस्त्या चौकशी समितीकडे जमा केलेल्या आहेत, तसेच या प्रकरणातील शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद केलेला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. त्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली.