Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:35 PM2022-12-26T12:35:33+5:302022-12-26T12:35:59+5:30
गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला.
नागपूर - सीमावादावर तोंड लपवायला जागा सरकारकडे शिल्लक नाही. कारण यांच्या २ मंत्र्यांनी राणा भीमदेवीच्या थाटात सांगितले आम्ही कर्नाटकात जाणार. मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला त्यानंतर चंद्रकांत पाटील गप्प झाले. दुसरा चंबु देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभु यांचा कर्नाटकबाबतीत चंबू झालाय. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला या सरकारकडून काही मिळणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर न्याय देणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेत येणार नाही तोपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही ही विरोधकांची भूमिका आहे आणि त्याबाबत आम्ही सभागृहात आवाज उचलणार आहोत. विदर्भ, मराठवाड्यावर लक्ष द्यायला सरकार तयार नाही. सीमाभागातील मराठी माणसांकडे पाहत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणार, घोटाळे करणार आणि त्यांना क्लीनचीट देण्याचं कामही सरकार करणार. सत्ताधारी पक्षाचे नेते सत्तेची धमकी देत आहेत. त्याचा अर्थ हे सरकार न्यायबुद्धीने वागणारं नाही. सर्वांना समान न्यायानं वागणूक देणारं नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला.
शंभूराज देसाईंनी घेतला समाचार
सभागृहात उद्धव ठाकरे दिसतायेत हे चांगले आहे. विधिमंडळात आल्यानंतर ते ठाकरे गटाच्या कार्यालयात न जाता काँग्रेस कार्यालयातून ते माघारी परतले. आज बऱ्याच दिवसांनी सभागृहात उपस्थित राहतील. राज्याच्या हिताबाबत, धोरणात्मक काही विषय दिशाभूल न करता सभागृहात मांडतील अशी अपेक्षा आहे. संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. माझी ५०-५५ वेळा सांगितले त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. रोज नवीन मुद्दा काढतात आणि भरकटत दुसऱ्या मुद्द्याकडे जातात. नरेश म्हस्के यांच्या विभागात एक दवाखाना आहे त्याठिकाणी राऊतांवर उपचार केले पाहिजेत. माध्यमेच राऊतांकडे लक्ष देतात आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितले.