Coronavirus: राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; आतापर्यंत ४१ जणांना बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:06 PM2020-03-17T18:06:21+5:302020-03-17T19:17:33+5:30
Coronavirus आज मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये सापडला कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण
मुंबई: राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज दोननं वाढ झालीय. पिंपरी चिंचवड आणि मुंबईत कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर जाऊन पोहोचलाय. देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १३० पेक्षा जास्त आहे. राज्यांमधल्या आकडेवारीचा विचार केल्यास कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
आज पिंपरी चिंचवड आणि मुंबईत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्ण आहेत. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे प्रत्येकी ७ रुग्ण आढळून आले आहेत. उपराजधानी नागपुरात कोरोनाचे चार जण रुग्ण आहेत. तर नवी मुंबई, कल्याण, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे.
मुंबईत आज एका रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी त्याला हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. या रुग्णाला रक्तदाब आणि मधुमेहाचादेखील त्रास होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कोरोनामुळेच झालाय, असं म्हणता येणार नाही. याबद्दलचा अहवाल प्राप्त झाल्यावरच त्यावर भाष्य करता येईल, असं दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. मात्र संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचं सांगितलं.
देशात आतापर्यंत १३८ जणांना कोरोनाची बाधा झालीय. यामध्ये महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातल्या १२१ जणांवर उपचार सुरू असून १४ जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. देशात आतापर्यंत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.