महाराष्ट्र तुमची आई आहे, तिची इभ्रत राखा- उद्धवनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
By admin | Published: March 22, 2016 08:39 AM2016-03-22T08:39:46+5:302016-03-22T09:48:09+5:30
विदर्भासोबतच वेगळ्या मराठवाड्याचीही भाषा करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर टीका करतानाच त्यांना पाठिशी घालणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही उद्धव ठाकरेंनी टोला हाणला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - विदर्भासोबतच वेगळ्या मराठवाड्याचीही भाषा करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर टीका करतानाच त्यांना पाठिशी घालणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टोला हाणला आहे. ओवेसीची जीभ कापून आणणार्यास लाखोचे इनाम लावणारे भाजपवाले महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणेंच्या बाबतीत इतके बुळबुळीत का झाले आहेत? शिवाजीराजांच्या आशीर्वादाची भाषा निवडणुकीपूर्वी करणारे मित्रवर्य अफझलखानाचा ‘महाराष्ट्र तोडो’ विडा का रंगवत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 'मुख्यमंत्री, महाराष्ट्र ही तुमची आई आहे. तिच्याही इभ्रतीचे गांभीर्याने पाहा!' असा सल्लाही उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध आरोप करणा-या दिग्विजय सिंग यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माफी मागण्यास सांगणारे, स्वत:च्या प्रतिमेबाबत इतके भावूक व संवेदनशील असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना याच कारवाईचा बडगा का उगारीत नाहीत? असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. महाराष्ट्र त्यांची आई आहे, आईचा अपमान करणे हे मुख्यमंत्र्यांना चालत असेल तर ही विदर्भाची संस्कृती अजिबात नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत हा अणे इतक्या माकडचेष्टा करूनही मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत इतके हळवे राहतात हे काही खंबीर राज्यकर्त्याचे लक्षण नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- निवडणुकीपूर्वी शिवाजी महाराज; निवडणुकीनंतर ‘अफझलखान’!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत. आपल्या सुविद्य पत्नी अमृता यांच्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे बोलबच्चन नेते दिग्विजय सिंग यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृतावहिनी या सुविद्य आहेत, अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षाही आहेत. मुंबईत विकासकांकडून ‘झोपु’वासीयांना भाड्यापोटी देण्यात येणारी रक्कम अॅक्सिस बँकेतच जमा करण्यात यावी असे म्हणे अप्रत्यक्ष सांगण्यात आल्याचा बकवास आरोप काँग्रेसच्या या बोलबच्चन नेत्याने केला. दिग्विजय सिंग हे बोलूनचालून काँग्रेसचे वाचाळवीरच आहेत. बेलगाम ‘टिवटिव’ आणि बेछूट आरोप हेच जणू या महाशयांचे गेल्या काही वर्षांपासून ‘पक्षकार्य’ बनले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध त्यांनी केलेले आरोप याच पद्धतीचे आहेत. याच आरोपामुळे अस्वस्थ होऊन मुख्यमंत्र्यांनी दिग्विजय सिंग यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माफी मागण्यास सांगितले. ते योग्यच झाले. प्रश्न इतकाच की, स्वत:च्या प्रतिमेबाबत इतके भावूक व संवेदनशील असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना याच कारवाईचा बडगा का उगारीत नाहीत?
- मुख्यमंत्र्यांनीच नेमलेले अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे हे रोज उठून महाराष्ट्राची बेअब्रू करीत आहेत. विदर्भ तोडा असे म्हणता म्हणता मराठवाडाही महाराष्ट्रापासून तोडा, असे म्हणू लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कसे काय सहन करू शकतात? अमृतावहिनी या त्यांच्या पत्नी आहेत, पण महाराष्ट्र त्यांची आई आहे. आईचा अपमान करणे हे मुख्यमंत्र्यांना चालत असेल तर ही विदर्भाची संस्कृती अजिबात नाही. श्रीहरी अणे नामक फालतू माणूस महाराष्ट्राच्या अॅडव्होकेट जनरलपदी नेमून मुख्यमंत्र्यांनी काही बरे केले नाही. शिवाय महाराष्ट्राच्या बाबतीत हा अणे इतक्या माकडचेष्टा करूनही मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत इतके हळवे राहतात हे काही खंबीर राज्यकर्त्याचे लक्षण नाही. ‘भारतमाता की जय म्हणणार नाही’ असे ओवेसीने म्हणताच ज्याच्या संतापाचा पारा चढला नाही व ज्याचे रक्त खवळले नाही तो या देशाचा नागरिक नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र तोडण्याची भाषा रोज करणारा श्रीहरी अणे हा आजही राज्याच्या अॅडव्होकेट जनरलपदी असणे हासुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे, पण मुख्यमंत्र्यांना आपल्या सुविद्य पत्नीच्या अपमानाची जितकी चिंता आहे त्यातली अंशभरही चिंता महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी व इज्जतीविषयी नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची राजवस्त्रे घालून मिरवण्याचा त्यांना अधिकार नाही.
- श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याशी राज्य सरकार असहमत आहे असे आता राज्याच्या महसूलमंत्र्यांनी सांगितले आहे. शिवाय यासंदर्भात मुख्यमंत्री उद्या विधानसभेत निवेदन करतील असेही सांगण्यात येत आहे. तेव्हा अणे महाशय ‘उणे’ होतात किंवा कसे हे उद्या कळेलच, पण यानिमित्ताने महाराष्ट्राच्या अखंडतेच्या मुद्यावर विधानसभेत सर्व पक्ष राजकीय मतभेद विसरून एकत्र आले हे सर्वात महत्त्वाचे. श्रीहरी अणे यांचे आजोबा लोकनायक बापूजी अणे यांनी त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतली होती. आज याच महाराष्ट्रविरोधाचा वारसा त्यांचे नातू श्रीहरी अणे अखंड महाराष्ट्राच्या महाधिवक्ता या महत्त्वाच्या पदावर बसून चालवीत आहेत. हा कोणता योगायोग मानायचा? मात्र या श्रीहरी अणेंच्या महाराष्ट्रद्रोहाविरोधातही राज्यातील सर्व राजकीय पक्ष मतभेद विसरून विधानसभेत एकत्र आले आहेत. याप्रश्नी विधानसभेचे कामकाज ठप्प करीत आहेत.
- विधानसभा हीच सार्वभौम आहे आणि महाराष्ट्राच्या या सार्वभौम विधानसभेने श्रीहरी अणेंच्या पार्श्वभागावर सणसणीत लाथ हाणली आहे. अर्थात ज्यांना त्यांच्या या दुखर्या पार्श्वभागावर फुंकर मारायची असेल त्यांनी त्यांना मांडीवर घ्यावे आणि खुशाल फुंकर मारीत बसावे. तो त्यांचा प्रश्न. आमचे इमान अखंड महाराष्ट्राशीच आहे आणि राहील. महाराष्ट्रद्रोह करणारे अणे जितके गुन्हेगार त्यापेक्षा जास्त गुन्हेगार हा महाराष्ट्रद्रोही मांडीवर घेऊन कुरवाळणारे राज्यकर्ते आहेत. ओवेसी व अणे यांची मानसिकता सारखीच आहे, पण ओवेसीची जीभ कापून आणणार्यास लाखोचे इनाम लावणारे भाजपवाले महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणेंच्या बाबतीत इतके बुळबुळीत का झाले आहेत? शिवाजीराजांच्या आशीर्वादाची भाषा निवडणुकीपूर्वी करणारे मित्रवर्य अफझलखानाचा ‘महाराष्ट्र तोडो’ विडा का रंगवत आहेत? मुख्यमंत्री, महाराष्ट्र ही तुमची आई आहे. तिच्याही इभ्रतीचे गांभीर्याने पाहा!