Maharashtra ZP Election Results 2021: स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 06:16 AM2021-10-07T06:16:52+5:302021-10-07T11:01:23+5:30

जि.प. पोटनिवडणूक निकाल; ओबीसीच्या जागा किंचित घटल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.

Maharashtra ZP Election Results 2021: Ruling party doubles seats as compare with BJP | Maharashtra ZP Election Results 2021: स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट 

Maharashtra ZP Election Results 2021: स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट 

Next

मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८५; तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४४ रिक्तपदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तथापि, भाजपच्या जागा मात्र घटल्याचे निकालावरून दिसते. नागपूर जि. प.मध्ये ओबीसींची १ जागा तर पंचायत समितीत १२ जागा कमी झाल्या आहेत. नंदुरबार जि. प.मध्ये ३ तर धुळे पंचायत समितीत ओबीसींची १ जागा कमी झाली.

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी स्वतंत्र लढूनही मिळविलेल्या जागांची बेरीज केल्यास भाजपहून दुप्पट जागा पटकावल्याचे दिसते. यामुळे ग्रामीण झुकते माप दिल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर पोटनिवडणुकीचे मंगळवारी मतदान होऊन बुधवारी मतमोजणी झाली. महाविकास आघाडीतील तीन पैकी दोन पक्ष एकत्र लढले किंवा तिघेही वेगवेगळे लढले, असे बहुतेक ठिकाणचे चित्र होते. अत्यंत अपवादात्मक ठिकाणीच तिघे एकत्र होते. धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या.

पालघरमध्ये शिवसेना-भाजपचा फायदा
पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपले सदस्य संख्याबळ दोनने वाढवीत पाच गटात विजय संपादन केला, तर भाजपने आपले संख्याबळ चारवरून पाच केले आहे. सीपीएमने आपला उधवा गट शाबूत ठेवला असताना राष्ट्रवादी पक्षाला मात्र सातपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत १५ जागांसाठी ७४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० असे एकूण १४४ उमेदवार रिंगणात होते.

तलासरी तालुक्यातील उधवा गटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अक्षय दवणेकर (४,९९७) यांनी भाजपच्या नरहरी निकुंभ (४,३७५) यांचा पराभव केला आहे. डहाणू तालुक्यातील चार गटांपैकी बोर्डी गटात भाजपच्या ज्योती पाटील (५,२८३) यांनी राष्ट्रवादीच्या उन्नती राऊत (४,८६७) यांचा पराभव केला. कासा गटात राष्ट्रवादीच्या लतिका बालशी (५,३१२) यांनी शिवसेनेच्या सुनीता कामडी (२,७२५) यांचा पराभव केला. सरावली गटात भाजपच्या सुनील माच्छी (४,१११) यांनी सीपीएमच्या रडका कलंगडा (३,६१६) यांचा पराभव केला. वणई गटात भाजपच्या पंकज कोरे (३,६५४) यांनी काँग्रेसच्या वर्षा वायडा (३,२४२) यांचा पराभव केला. शिवसेना उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटात भाजपच्या संदीप पावडे (४,१५३) यांनी राष्ट्रवादीच्या विपुल पाटील (३,३५१) यांचा ८०२ मतांनी पराभव केला. मोखाडा तालुक्यातील आसे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष हबीब शेख (५,६७५) यांनी भाजपच्या शिवा निसाळ (४,०१४) यांचा पराभव केला. पोशेरा गटात शिवसेनेच्या सारिका निकम (४,३१३) यांनी भाजपच्या किशोरी गाटे (३,९८६) यांचा पराभव केला.
वाडा तालुक्यातील गारगाव गटात राष्ट्रवादीच्या रोहिणी शेलार (६,७५५) यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील (४,९१३) यांचा पराभव केला. मोज गटात सेनेच्या अरुण ठाकरे (५,४९५) यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद देशमुख (३,४३१) यांचा पराभव केला. मांडा गटात राष्ट्रवादीच्या अक्षता चौधरी (४,११४) यांनी भाजपच्या राजेंद्र कुमार पाटील (३,७६८) यांचा पराभव केला. पालसई गटात शिवसेनेच्या मिताली बागुल (५,३२९) यांनी भाजपच्या धनश्री चौधरी (४,०३८) यांचा पराभव केला. आबिटघर गटात राष्ट्रवादीच्या भक्ती वलटे (३,६७९) यांनी निसटत्या मताने भाजपच्या मेघना पाटील (३,६५८) यांच्यावर अवघ्या २१ मताने विजय मिळविला. पालघर तालुक्यातील सावरे-एम्बूर गटात शिवसेनेच्या विनया पाटील (६,५७६) यांनी बहुजन विकास आघाडीच्या प्रांजल पाटील (२,९४१) यांचा पराभव केला. नंडोरे-देवखोप या गटात मागच्या पराभवाचे उट्टे काढीत शिवसेनेच्या नीता पाटील (४,०७२) यांनी राष्ट्रवादीच्या कविता खटाळी (३,२०५) यांचा पराभव केला.

पक्षीय बलाबल

जिल्हा परिषद
भाजप - २२
कॉँग्रेस - १९
रा. कॉँ. - १५
शिवसेना - १२
इतर - १८
एकूण - ८५ 

पंचायत समिती
भाजप - ३३
कॉँग्रेस - ३६
रा. कॉँ. - १८
शिवसेना - २३
मनसे - १
इतर - ३३
एकूण - १४४

Web Title: Maharashtra ZP Election Results 2021: Ruling party doubles seats as compare with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.