महाराष्ट्रातील बोगस डॉक्टर लोकायुक्तांच्या रडारवर; कारवाईची माहिती सादर करा, अधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:40 PM2021-11-27T12:40:09+5:302021-11-27T12:41:09+5:30
या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना द्यावी. या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.
अमर मोहिते -
मुंबई : महाराष्ट्रातील बोगस डॉक्टरांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सादर करण्याचे आदेश लोकायुक्त न्या. व्ही. एम. कानडे यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व पोलीस यांना दिले आहेत.
या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना द्यावी. या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे अधिकृत नोंदणी नसलेले बोगस डॉक्टर हे समाजासाठी धोकादायक आहेत. झोपडपट्टी भागातच बोगस डॉक्टर अधिक असतात. अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू होत असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच बोगस डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही लोकायुक्त न्या. कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे नोंदणी नसलेले अनेक बोगस डॉक्टर आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांची नाेंदणी रद्द करायला हवी, अशी मागणी करणारा अर्ज अमित मिश्रा यांनी लोकायुक्तांसमोर केला होता. हे प्रकरण जनहितार्थ असल्याने लोकायुक्त न्या. कानडे यांनी ते सुओमोटो दाखल करून घेतले व वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली.
होमिओपॅथीचे १३६ बोगस डॉक्टर -
मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांनी बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईची माहिती लोकायुक्त यांच्याकडे सादर केली. त्यानुसार १३६ बोगस डॉक्टरांचे नाव नोंदणी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. ही कारवाई अशी सुरू ठेवा, असेही लोकायुक्त यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांना सांगितले आहे.