स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:53 AM2017-10-02T04:53:09+5:302017-10-02T04:53:21+5:30
स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
मुंबई : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागातील हागणदारीमुक्तीबाबतच्या ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. राष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व संबंधित घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याबाबत राष्ट्रपतींनी राज्याचे अभिनंदन केले.
महाराष्ट्राची सुमारे ४९ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे अर्धा महाराष्ट्र आज हागणदारीमुक्त झाला आहे. स्वच्छतेसाठी काम करणे ही ख-या अर्थाने मानवतेची सेवा आहे, असेही ते म्हणाले.
मानसिकता बदलण्याची गरज
लोकांची मानसिकता, तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाने ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’ पथके स्थापन करून या कामाला पुढे नेले. राज्याने दोन वर्षांत ४० लाख शौचालयांची निर्मिती केली. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपतींचा पहिलाच मुंबई दौरा
पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी पहिल्यांदाच एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या वेळी तिन्ही सेनादलांच्या संयुक्त तुकडीने राष्ट्रपतींना सलामी दिली.
मुंबईकरांचे कौतुक
मुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईवासी नेहमीच आव्हानांचा सामना करीत पुढे जात असतात, या शब्दांत त्यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.