महाराष्ट्राचा ‘डिजिटल स्कूल पॅटर्न’ ओरिसा अवलंबणार
By admin | Published: November 4, 2016 06:50 PM2016-11-04T18:50:48+5:302016-11-04T18:50:48+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढवायचा, लोकवर्गणीतून भौतिक सुविधा वाढवायच्या, त्यातूनच शाळा डिजिटल करायची...
Next
>ऑनलाइन लोकमत/अविनाश साबापुरे
यवतमाळ, दि. 04 - जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढवायचा, लोकवर्गणीतून भौतिक सुविधा वाढवायच्या, त्यातूनच शाळा डिजिटल करायची... महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचा हा पॅटर्न आता इतर राज्यही स्वीकारत आहेत. शाळा डिजिटल कशा करायच्या, याबाबत ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांचे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार ३ दिवसांचे प्रशिक्षणही झाले आणि आता पहिल्या टप्प्यात ओरिसातील ३६१ शाळा डिजिटल होणार आहेत.
प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शिक्षकांना नवनवीन ‘ट्रिक’ सांगितल्या. डिजिटल शाळा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ठाणे जिल्ह्यातील पस्टेपाडा येथील शिक्षक संदीप गुंड यांनी नानाविध अडचणींवर मात करीत आपली शाळा डिजिटल करून दाखविली. मग त्ययांच्याच मार्गदर्शनात गेल्या दोन वर्षात राज्यभरात डिजिटल शाळांची लाटच आली. संदीप गुंड यांनी राज्यात शंभराहून अधिक डिजिटल कार्यप्रेरणा कार्यशाळा घेतल्या. केंद्रप्रमुख महेंद्र धिमते यांचे सहकार्य लाभले. त्यातून महाराष्ट्रात आतापर्यंत १५ हजार २०० शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांनी चक्क १२१ कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. शिक्षकांच्या या धडपडीचा परिणाम म्हणजे, इतर खासगी शाळांतील सुमारे १४ हजार विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील या शैक्षणिक परिवर्तनाने ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक प्रभावित झाले. ओरिसामधील शाळाही डिजिटल व्हाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी महाराष्ट्रातील डिजिटल शाळांचे प्रणेते ठरलेले पस्टेपाड्याचे शिक्षक संदीप गुंड यांना तीन दिवस ओरिसामध्ये बोलावण्यात आले. गुंड यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेत त्यांनी पहिल्या दिवशी ओरिसातील सर्व शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांना प्रशिक्षण दिले. दुसºया दिवशी निवडक शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर तिसºया दिवशी संदीप गुंड आणि त्यांचे सहकारी दादाभाऊ पठारे स्वत: ओरिसातील काही शाळांमध्ये गेले. तेथे डिजिटल साहित्याच्या माध्यमातून अध्यापन केले. डिजिटल क्लासरूमला तेथील विद्योेर्थी कसा प्रतिसाद देतात, याचा अभ्यास करण्यात आला. आता मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा गृहजिल्हा असलेल्या छत्रपूर जिल्ह्यातील ३६१ शाळा पहिल्या टप्प्यात डिजिटल करण्याचा निर्णय ओरिसा शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्राच्या दोन शिक्षकांची कामगिरी
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक विजय कुलांगे हे आयएएस अधिकारी सध्या ओरिसातील छत्रपूर जिल्ह्यात प्रोजेक्ट आॅफिसर आहेत. छत्रपूर हा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा जिल्हा आहे. विजय कुलांगे यांनीच महाराष्ट्रातील शैक्षणिक परिवर्तन, डिजिटल स्कूल पॅटर्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर छत्रपूरमधील जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व लोकप्रतिनिधींना महाराष्ट्राच्या दौºयावर पाठविण्यात आले. येथील तंत्रस्नेही शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिक्षक संदीप गुंड यांची कार्यशाळा भुवनेश्वरमध्ये आयोजित करण्यात आली. या निमित्ताने विजय कुलांगे आणि संदीप गुंड या दोन शिक्षकांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
डिजिटल स्कूलसाठी महाराष्ट्राचे मार्गदर्शन घेणारे ओरिसा हे पहिले राज्य नाही. यापूर्वी मी आणि महेंद्र धिमते यांनी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगालमधील अधिकारी आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची ही पावती आहे.
- संदीप गुंड, डिजिटल स्कूल संकल्पनेचे प्रणेते