जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

By admin | Published: November 18, 2016 05:22 AM2016-11-18T05:22:50+5:302016-11-18T05:22:50+5:30

‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला.

Maharashtra's dominance in Jaipur | जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

Next

मुंबई : ‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर कब्जा करताना महाराष्ट्राने या खेळातील आपले वर्चस्व स्पष्ट केले. ३ सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ५ पदकांची कमाई करुन महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद उंचावले. त्याचवेळी यजमान राजस्थान संघाने उपविजेतेपद पटकावले.
सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मनिष राव - भूषण पोतणीस या कसलेल्या जोडीने अपेक्षित बाजी मारताना यजमान राजस्थानच्या भरत राज - प्रशांत यांचा ११-५, ११-७ असा धुव्वा उडवला. मनिष - भूषण यांच्या आक्रमक खेळापुढे यजमानांच्या जोडीचा काहीच निभाव लागला नाही.
महिला दुहेरीमध्येही करिष्मा - ॠतुजा यांनी एकतर्फी बाजी मारताना महाराष्ट्राच्या पदरी आणखी एक सुवर्ण पदकाची भर टाकली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या करिष्मा - ॠतुजा यांनी राजस्थानच्या गरिमा - मधुलिका यांचा ११-२, ११-३ असा फडशा पाडला.
त्याचवेळी, मिश्र दुहेरीमध्ये मात्र महाराष्ट्राच्या अतुल एडवर्ड - नताशा बेग या बलाढ्य जोडीला झुंजावे लागले. राजस्थानच्या अश्वनी - कविता यांनी तीन सेटपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या जोडीला कडवी टक्कर दिली.
मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा चांगला अनुभव असलेल्या अतुलने नताशासह मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना अश्वनी - कविता यांचे आव्हान ११-१, ५-११, ११-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra's dominance in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.