महाराष्ट्राने निवडली अठरा रत्ने!

By admin | Published: April 4, 2016 03:52 AM2016-04-04T03:52:31+5:302016-04-04T03:52:31+5:30

यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत आणि वरदवंतांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि मनामनात पोहोचलेल्या लोकमत परिवाराने कोट्यवधी वाचकांच्या वतीने केलेला कुर्निसात उभ्या महाराष्ट्राला भावणारा ठरला.

Maharashtra's eighteen gems selected! | महाराष्ट्राने निवडली अठरा रत्ने!

महाराष्ट्राने निवडली अठरा रत्ने!

Next

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर : अजोय मेहता, खा. राजीव सातव, प्रा. दीपक फाटक, नाना पाटेकर, शंकर महादेवन, डॉ. आनंद देशपांडे, सतीश मगर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, शशिकांत धोत्रे, ललिता बाबर, रज्जाक पठाण ठरले मानकरी

मुंबई : यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत आणि वरदवंतांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि मनामनात पोहोचलेल्या लोकमत परिवाराने कोट्यवधी वाचकांच्या वतीने केलेला कुर्निसात उभ्या महाराष्ट्राला भावणारा ठरला. लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’चा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे राज्यातील सर्वांत प्रभावी राजकारणी ठरले. लोकमतच्या लाखो वाचकांनी केलेल्या आॅनलाइन मतदानात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील चौदा रत्ने निवडली तसेच अन्य चार विशेष पुरस्कारही यावेळी मान्यवरांना देण्यात आले. 
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ प्रस्तुत आणि धूत ट्रान्समिशन यांच्या सहयोगाने लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळीच एनसीपीएच्या सभागृहात जमली होती. अनेकानेक क्षेत्रांमध्ये दुर्गम्य शिखरे लीलया सर करून त्यावर मुक्काम ठोकणारे दिग्गज कमालीच्या अनौपचारिकपणे रसिकगणांच्या गर्दीत रमून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाजीरावांच्या अदाकारीमुळे मराठी मनांचा मानबिंदू ठरलेला रणवीर सिंग, गानसम्राज्ञी आशाताई भोसले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी उद्योजिका नीता अंबानी, ‘नटसम्राट’ नाना पाटेकर, रसिकांच्या काळजातून सुरांची कट्यार आरपार नेणारे पंडित शंकर महादेवन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उद्योजकाग्रणी हर्ष गोएंका आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याला एरवी अशा पुरस्कारांच्या समारंभात कधीही न दिसणारा आमीर ‘लोकमत’च्या प्रेमापोटी मात्र आवर्जून उपस्थित राहिला. 
इतकेच नव्हे, ‘मल्हारी’ गाण्यावर रणवीरच्या बरोबरीने त्याची पावले थिरकली आणि टाटा थिएटरचे छप्पर दणाणून गेले. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’ समूहाचे ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा यांनी तितक्याच आदबीने सर्वांचे स्वागत केले. ‘कल्पतरूंचे आरव’ ही ज्ञानदेवांनी मराठी साहित्याला बहाल केलेली कल्पनातित प्रतिमा. त्याची प्रचिती लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६च्या या सोहळ्याने वेगळ्या पद्धतीने दिली. आपले सारे कसब, अलौकिक कलागुण, अपूर्व नवोन्मेष आणि असे खूप काही उदारहस्ते महाराष्ट्र भूमीवर उधळून टाकणारे चालते-बोलते कल्पवृक्ष या पुरस्कारांच्या निमित्ताने लोकमतच्या व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वत:च महाराष्ट्राचा मानबिंदू बनलेल्या आणि ‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ हे ब्रीद जपणाऱ्या लोकमतच्या वाचकांनी ह्या पुरस्कारांच्या रूपाने या जित्या जागत्या कल्पवृक्षांना सलाम केला; शिवाय उच्चरवाने समर्थांच्या शब्दांत आवर्जून सांगितले... 
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हां कारणे।।
एनसीपीएच्या प्रांगणात नव्हे, तर अशा कल्पवृक्षांच्या अरण्यातील ही संध्याकाळ त्यामुळेच तर अविस्मरणीय ठरली. 
>>> पाच लाखांचा जीवनगौरव : गानसम्राज्ञी आशा भोसले यांना लोकमतने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चौदा लाख मते : लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराच्या विविध विभागांतील नामांकित झालेल्या मान्यवरांची निवड करण्याची संधी आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली होती. तब्बल चौदा लाख वाचकांनी आपली मते नोंदविली. कोणत्याही पुरस्कारासाठी आलेली ही सर्वाधिक मते नोंदली आहेत. 
>>
राजकारण (प्रभावी)
नितीन गडकरी 
(   केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री) -                                                                                   
राजकारणात चांगलं काम करणाऱ्याला सन्मान आणि वाईट काम करण्याला शिक्षा कधीच मिळत नाही, परंतु राजकारणी असूनही ‘लोकमत’ने माझा सन्मान केला, त्याबद्दल मी ‘लोकमत’, निवड समिती आणि महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी आहे. समाजासाठी आतापर्यंत जे काम केलं, त्यापेक्षाही अधिक काम करण्याचे मी पूर्ण प्रयत्न करेन. जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करेन.
-------------------
> प्रशासन - राज्यस्तर 
अजोय मेहता 
(मुंबई महापालिका आयुक्त) 
 
या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ‘लोकमत’ परिवाराचे खूप खूप आभार! हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मला खरोखरीच खूप धन्य वाटत आहे. या महान राज्यासाठी आणखी चांगले काम करण्यासाठी अधिक कटिबद्ध करण्याचे काम या पुरस्काराने केले आहे. या पुढेही मी अधिक समाजाभिमुखपणे प्रशासन राबविण्याचे प्रयत्न करीत राहीन. ‘लोकमत’ परिवाराला शुभेच्छा!
----------------
> विज्ञान-तंत्रज्ञान
प्रा. दीपक फाटक,
(आकाश टॅबचे जनक)
 
एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचा आनंदच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या कामांची यादी घेणे, त्यांच्या कामांची दखल घेणे आणि त्यातून निवड करणे, हे मोठे कसोटीचे काम असून, ते ‘लोकमत’ने प्रत्यक्षात केले. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला आले, ते पाहता, ‘लोकमत’ महाराष्ट्रात क्रमांक १ वर का आहे, याची प्रचिती आज आली. 
------------------------
प्रशासन - विभागीय
संदीप पाटील, 
(पोलीस अधीक्षक, गडचिरोली)
‘लोकमत’ने दिलेला हा पुरस्कार मी, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात लोकशाहीच्या रक्षणासाठी अहोरात्र दक्ष राहणाऱ्या हजारो वीर जवानांना आणि या कामगिरीत आतापर्यंत हौतात्म्य पत्करलेल्यांना समर्पित करतो. या पुरस्कारामुळे गडचिरोलीतील समस्यांकडे आणि येथे चाललेल्या कार्याकडे देशाचे लक्ष वेधले जाईल आणि मदतीचा ओघही वाढेल, असा विश्वास वाटतो.
----------------------------
चित्रपट - पुरुष 
नाना पाटेकर (नटसम्राट) 
एखादा पुरस्कार हा तुम्ही साकारलेल्या कलाकृतीला दिलेली पोचपावती असते. त्यातून तुमच्या कलाकृतीचे जसे मूल्यमापन होते, त्याचप्रमाणे तुमच्याकडून आणखीन काही चांगले करण्याची अपेक्षा व्यक्त होते. निवड करणाऱ्यांची आवड वेगवेगळी असू शकते व त्याबद्दल अकारण शंका घेण्याचे कारण नाही, परंतु एकाची निवड झाली आणि दुसऱ्याची नाही, म्हणून त्याचे काम लहान ठरत नाही.
----------------------------
क्रीडा, ललिता बाबरचे पालक (अ‍ॅथलीट)
 
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल 
धन्य वाटत आहे आणि ‘लोकमत’चे 
खूप आभार. मराठी वातावरणात वाढलेल्या आमच्या मुलीचा खूपच अभिमान वाटतोय. (आगामी आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ललिता बाबरची सध्या उटी 
आणि बंगळुरूमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याने तिचे पालक या सोहळयासाठी उपस्थित होते.)
------------------------------
राजकारण (अपेक्षा)
राजीव सातव 
(कॉँग्रेस खासदार, हिंगोली) 
मला ‘लोकमत’ परिवाराने दिलेला हा पुरस्कार अमूल्य असाच आहे. माझ्याप्रमाणेच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांची नावेही या पुरस्कारासाठी स्पर्धेत होती. त्यांच्या कार्यालाही मी प्रणाम करतो. प्रत्येक जण आपापल्या परीने तितकेच तोलामोलाचेच काम करीत आहेत. या पुरस्काराने मला सामान्य माणसाशी असलेले नाते घट्ट करण्यास बळ दिले आहे.
----------------
इन्फ्रास्ट्रक्चर
सतीश मगर 
(मगरपट्टा टाउनशिप कंपनी) 
या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल ‘लोकमत’ आणि ज्युरीचे आभार. बांधकाम व्यावसायिकाला पहिल्यांदाच असा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची ‘लोकमत’ने दखल घेतली, याचा खूपच आनंद आहे. ज्यांना घरांची खरोखर गरज आहे, अशा गरजवंतांसाठी परवडतील अशा दरातील घरे बनविण्याचा आमचा या पुढेही पूर्ण प्रयत्न राहील. ‘लोकमत’ला खूप खूप शुभेच्छा!
 
------------------------
बिझनेस 
डॉ. आनंद देशपांडे 
(पर्सिस्टंट सीस्टम्स) 
पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यातच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, त्याचा मला विशेष अभिमान आहे. ‘लोकमत’चे विशेष आभार. ‘लोकमत’ परिवाराच्या अनेक सामाजिक उपक्रमांची मला माहिती आहे. या उपक्रमांबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांनी असेच राज्याचे नाव मोठे करीत राहावे.
------------------------
परफॉर्मिंग आर्ट 
शंकर महादेवन
(कट्यार काळजात घुसली)
मी महाराष्ट्रात जन्म घेतला आहे. माझी कर्मभूमीही महाराष्ट्रच आहे. संस्कारांनी मी मराठीच आहे. मी लग्नही मराठी मुलीशी केले. मी पूर्णपणे महाराष्ट्रीयच आहे. त्यातच आता ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाला, याचा खूपच आनंद आहे. ‘लोकमत’शी माझे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ‘लोकमत’ने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याच्या गायकांमध्येही माझा समावेश आहे.
-------------------
रंगभूमी
मुक्ता बर्वे 
(छापाकाटा) 
असे प्रेस्टिजियस अवॉर्ड हातात असताना तुम्ही बोलू शकत नाही. खूप भारावून जाता. पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप असून, पुढे आणखीन चांगले काम करण्याचे प्रोत्साहन आहे. सर्वच नॉमिनीज हे पुरस्कार विजेतेच आहेत. सत्याची चाड असलेले व समाजासाठी काहीतरी करू पाहणारे ‘लोकमत’ हे वृत्तपत्र आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूपच प्रेस्टिजियस आहे.
--------------------
चित्रपट - स्त्री
अमृता सुभाष 
(किल्ला) 
अवॉर्डच्या पलीकडे एक सच्चा आनंद या पुरस्कार सोहळ्याने मला दिला. वेगवेगळ्या क्षेत्रांत होणाऱ्या अतुलनीय कार्याला या कार्यक्रमात गौरवले गेले. अशा या सच्चेपणाशी आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन असल्याशी मी आज जोडले गेले, असे मला वाटते. मला भरभरून मते देणाऱ्यांची, मायबाप प्रेक्षकांची आणि ‘लोकमत’ची मी खूप खूप आभारी आहे. ‘लोकमत’शी आज नवीन व जवळचे नाते जोडले गेले.
कला
------------------
शशिकांत धोत्रे 
(पेन्सील स्केच) 
पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. खरे तर, सर्वच नॉमिनीज चांगले कलावंत आहेत. महाराष्ट्रातील ज्या कलाप्रेमींनी मला आॅनलाइन मतं दिली आणि या पुरस्कारासाठी योग्य समजले, त्या कलारसिकांचा आणि ‘लोकमत’ समूहाचा मी मनापासून आभारी आहे. लहानपणापासून ‘लोकमत’ वृत्तपत्र वाचत आलो आहे आणि आजही वाचत आहे. ‘लोकमत’च्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Web Title: Maharashtra's eighteen gems selected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.