पहिला दिवस महाराष्ट्राचा!
By Admin | Published: February 14, 2016 01:47 AM2016-02-14T01:47:18+5:302016-02-14T01:47:18+5:30
मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कृषी व ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री
मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कृषी व ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोका-कोला, रेमंड आणि ट्विन स्टार या कंपन्यांसोबत करार करण्यात आले. विदर्भातील संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या करारामुळे दिलासा मिळणार आहे.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पसंतीचे ठिकाण असल्याची अनुभूती मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आली. एमएमआरडीए मैदानावरील महाराष्ट्र पॅव्हेलिअनमध्ये फिनलँड, पोलँड आणि जपानच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रा ज्युस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज कंपनी, जैन इरिगेशन कंपनी आणि राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग यांच्यात करार झाला. या करारानुसार, विदर्भात संत्रा व मोसंबी रस प्रक्रिया आणि त्याचा रस बाटलीबंद करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होणार असून, लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे. ५ हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
तर, रेमंड इंडस्ट्री आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात दुसरा सामंजस्य करार झाला. फार्म टू फॅब्रिक धोरणानुसार हा करार करण्यात आला आहे. या करारनुसार रेमंड उद्योगसमूह लिनन व फॅब्रिक्स् कापडाच्या उत्पादनासाठी १४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
राज्यात एलसीडी उत्पादनासंदर्भाथ राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि ट्विन स्टार (स्टरलाइन कंपनी) यांच्यात तिसरा सामंजस्य करार झाला. ट्विन स्टार कंपनी ही तैवानच्या ओट्रॉन या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करून हा प्रकल्प उभारणार असून, सुमारे २० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे.
- महाराष्ट्र हे देशाचे फ्रुट बास्केट असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पोलंडने राज्यात गुंतवणूक करावी. तसेच ‘२०१७ हे महाराष्ट्र भेट वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे, यात पोलंडने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलंडचे पहिले उपपंतप्रधान प्रा. ग्लिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला केले. तर, फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपीला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा या क्षेत्रात राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.