पोस्ट पेमेंट बँक सेवेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:11 AM2019-01-29T05:11:36+5:302019-01-29T05:12:05+5:30
अडीच लाख खातेदारांची झाली नोंद
- खलील गिरकर
मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरातील कामगिरीमध्ये ‘अ’ गटात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र व गोवा सर्कलला प्रथम क्रमांक मिळाला. सर्कलला केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते गौरवण्यात येईल. २ लाख ५० हजार ६५५ खातेदारांसह महाराष्ट्र व गोवा सर्कलने ‘अ’ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यात टपाल खात्याच्या पेमेंट बँकेला चांगला प्रतिसाद मिळत असून ४२ शाखांच्या माध्यमातून बँकेचे कामकाज चालते. राज्यातील टपाल खात्याच्या सुमारे १२ हजार टपाल कार्यालयांपैकी तब्बल १० हजार ६८८ टपाल कार्यालयांमध्ये पेमेंट बँकेचे अॅक्सेस पॉइंट सुरू करण्यात आले. या खातेदारांच्या माध्यमातून ५ कोटी २६ लाखांच्या ठेवी जमा करण्यात यश आले आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल हे मंत्र्यांच्या हस्ते ३० जानेवारीला दिल्लीतील कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारतील. सध्या महाराष्ट्र सर्कल प्रमुख (आॅपरेशनल) म्हणून डॉ. अजिंक्य काळे काम पाहतात. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची कामगिरी या पुरस्कारासाठी विचारात घेतली आहे. राज्यात कोल्हापूर शाखेची कामगिरी सर्वात प्रभावी झाली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसाद
राज्यात कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात पेमेंट बँकेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. कोल्हापूर शाखेत ६४ हजार ६८२ खाती सुरू केली आहेत. त्यानंतर सांगली शाखेमध्ये ३०, ६४५ खाती सुरू झाली आहेत. रत्नागिरी शाखेद्वारे ११,७८६ खाती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शाखेअंतर्गत ११,५८५ तर, नांदेड शाखेद्वारे १०,२८८ खाती सुरू करण्यात आली आहेत. गडचिरोली शाखेत राज्यातील सर्वात कमी म्हणजे ४८४ खाती सुरू करण्यात आली. मुंबईतील अंधेरी शाखेत ३१३२ तर गिरगाव शाखेत ३०३३ खाती सुरू करण्यात आली.