राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक
By admin | Published: October 17, 2014 11:19 PM2014-10-17T23:19:26+5:302014-10-17T23:53:08+5:30
महिला एनसीसी कबड्डी : एकाचवेळी खेळल्या ‘कर्मवीर’ महाविद्यालयाच्या दहा मुली
इस्लामपूर : राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने (एन. सी. सी.) दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या महिला संघाने अंतिम फेरीत पश्चिम बंगालचा १९-९ असा १0 गुणांनी पराभव करीत सुवर्णपदकावर ‘कर्मवीर’ची मुद्रा उमटवली. तसेच राज्याचा पुरुष संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्ली येथील राष्ट्रीय छात्रसेनेच्या कवायत मैदानावर या स्पर्धा १0 ते १७ आॅक्टोबर या कालावधीत झाल्या. यामध्ये महिला गटातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व १0 मुली या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या आहेत. एकाचवेळी संपूर्ण राज्याच्या संघात एकाच महाविद्यालयाच्या खेळाडू खेळणे ही दुर्मीळ बाब ठरली आहे. ‘कर्मवीर’ची रेश्मा मोरे हिने मुलींच्या, तर अजिंक्य वडार याने मुलांच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.
महाराष्ट्राच्या महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत दबदबा निर्माण करताना आसाम, ओरिसा, उत्तराखंड, पंजाब या संघांचा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. पश्चिम बंगालबरोबरच्या अंतिम सामन्यात कर्णधार रेश्मा मोरे, मेघाराणी खोत, नेहा सांगलीकर यांच्या पकडीने पश्चिम बंगालची आक्रमणाची धार बोथट करून टाकली. तसेच पल्लवी जाधव, गौरी पाटील, पूजा पाटील, शीतल मोटे यांच्या आक्रमक व पल्लेदार चढायांनी त्यांचे क्षेत्ररक्षणही खिळखिळे करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सायली कुंभार, ऋतुजा पाटील, अश्विनी पाटील यांच्या अष्टपैलू खेळाने संघाने विजय मिळविला.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र व दिल्लीच्या संघात लढत झाली. अजिंक्य वडार याच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाने दिल्लीला चुरशीची लढत दिली. मात्र, शेवटच्या क्षणी २९-२७ अशा दोन गुणांच्या फरकाने दिल्लीने विजेतेपद पटकावले.‘कर्मवीर’चे क्रीडा प्रशिक्षक प्रा. वीरसेन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींचे सराव शिबिर झाले होते. महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनचे कर्नल ओझा, सोनिया यादव यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले. या विजेत्या संघाचे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सरचिटणीस प्रा. डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)