‘महाराष्ट्राचे अमेरिकेशी जिव्हाळ्याचे नाते’
By admin | Published: March 4, 2016 03:18 AM2016-03-04T03:18:08+5:302016-03-04T03:18:08+5:30
अनेक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यात महाराष्ट्रातील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. अमेरिकेत अनेक मराठी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात
मुंबई : अनेक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यात महाराष्ट्रातील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. अमेरिकेत अनेक मराठी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात. तसेच मेक इन महाराष्ट्राच्या हाकेला सर्वाधिक प्रतिसाद अमेरिकेतील गुंतवणुकदारांनीच दिला. अमेरिकेतील तब्बल ३० गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे अमेरिकेशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
मुंबईतील अमेरिकी दुतावासात आयोजित अमेरिकेच्या २४० व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय - अमेरिकी ‘मिस अमेरिका २०१४’ नीना डाऊलुरी सन्माननीय अतिथी आणि अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सिल जनरल टॉम वाजडा कार्यक्रमाचे यजमान होते. जुलैमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता गृहीत धरून हा सोहळा मुंबईत चार महिने आधीच साजरा करण्यात आला. या वेळी दुतावासातील अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सादर केलेले भारताचे राष्ट्रगीत आणि युएस मरिनच्या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीकडून सर्वात जुन्या लोकशाहीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.
नीना यांनी या वेळी त्यांच्या भारतासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला. तामिळनाडूत त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या शाळेबद्दल माहिती देत, आजही शिक्षणाच्या प्रसाराबाबत त्यांना विशेष आस्था असल्याचे सांगितले. त्यासाठीच त्या सध्या ‘स्टेम’ शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करीत असल्याचे म्हणाल्या. टॉम वाजडा यांनी त्यांच्या भाषणात भारत- अमेरिकेतील साधर्मे अधोरिखित केली. दोन्ही देश बाहेरून येणाऱ्यांना सामावून घेतात आणि त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देतात, असे वाजडा म्हणाले. महात्मा गांधीच्या शिकवणीबाबतचा आदरही त्यांनी व्यक्त केला.
दुतावासाच्या भव्य प्रांगणात अमेरिकेतील सहा राज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यात प्रत्येक राज्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली होती. तसेच तेथील विशेष खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेतील शहरांतूनच फिरत असल्याचा अनुभव पाहुण्यांना घेता येत होता. त्याचबरोबर अमेरिकी व्हिंटेज गाड्याचे प्रदर्शनही विशेष आकर्षण ठरत होते. अनेकांना या गाड्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. (प्रतिनिधी)