अंधत्व निवारणात महाराष्ट्राची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:10 AM2018-06-10T01:10:19+5:302018-06-10T01:10:19+5:30
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या एका वर्षांत ७ हजार ५६० नेत्रसंकलनाचा उच्चांक झाला आहे.
- पराग कुंकुलोळ
चिंचवड - राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या एका वर्षांत ७ हजार ५६० नेत्रसंकलनाचा उच्चांक झाला आहे.
नेत्रदानाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. शासकीय यंत्रणेबरोबच काही सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवित आहेत. तरीही राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पश्च्यात होणारे नेत्रसंकलन यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करून मृत्यूनंतर नेत्रदान प्रक्रिया सुलभ असून, त्याविषयी समाजात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे.
रामचंद्र भालचंद्र यांचा विसर.... शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ऐंशी हजारांहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या. अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १९७९ मध्ये १० जून रोजीच मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून १० जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो. मात्र, हा दिवस दृष्टिदान दिन साजरा करताना अवघा महाराष्ट्राला डॉ. भालचंद्र यांचा विसर पडला आहे.
आॅनलाइन पद्धतीचा उपयोग सध्या राज्यातील बहुतांशी नेत्रपेढीचे कार्य आॅनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. नेत्रदान प्रक्रियेनंतर मिळणारे बुबुळ योग्य रुग्णाला उपयोगी यावे, यासाठी ही प्रक्रिया उत्तम ठरत आहे. राज्यात अंधत्व नियंत्रण अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. आधुनिक पद्धतीचा वापर करत दृष्टिहीन व्यक्तींना योग्य उपचार मिळण्यासाठी तत्परता वाढली आहे. विविध घटनेतून दृष्टी गमावलेल्या रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळावेत यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याविषयी समाजात काही प्रमाणात जनजागृती वाढल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळू लागले आहेत.
दृष्टिदान दिवसाची नाही जागतिक स्तरावर नोंद
1स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा शहरात असणाºया जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदी व या विषयातील तज्ज्ञांशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता १० जून या दिवसाची जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून कोठेही नोंद नसल्याचे समोर आले आहे.
2उलट मराठवाड्यातील डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा विसर महाराष्ट्राला पडला ही शोकांतिका आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे. त्यांचे नेत्रदानाबाबत असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दिवशी जनजागृती अभियान राबविली जाते, ही खरी पार्श्वभूमी असल्याचे नेत्रदान विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.