शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्राचा स्वत:चा ‘पॅटर्न’ : वर्षा गायकवाड :
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:06 PM2020-02-14T18:06:53+5:302020-02-14T18:16:04+5:30
शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इतर राज्यांच्या चांगल्या गोष्टी घेणार
पुणे : ‘दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी सरकारी शाळांचा दर्जा उंचावला आहे. त्यानुसार शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इतर राज्यांच्या चांगल्या गोष्टी घेत वेगळा पॅटर्न राबविला जाईल,’ असे शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितले.
‘ई-बालभारती’ प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरुमच्या उद्घाटनानंतर गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. १४) पत्रकारांशी संवाद साधला. शाळा तसेच शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे, विविध योजना, शुल्करचना, भरती प्रक्रिया यासह शालेय शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार आहे. विविध घटकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. याचा तयारी पुर्ण झाली असून या महिन्यात काम सुरू होईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. विविध योजना, शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेतला जात आहे. या योजनांमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवेत. सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. त्यानुसार बदल केले जातील. याबाबत शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात यासंदर्भात निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमुद केले.
राज्यातील मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असल्याबाबत गायकवाड म्हणाल्या, सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता वाढायला हवी ही प्राथमिकता असेल. जिल्हा परिषद, पालिकांच्या काही शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही आहेत. या शाळांची उदाहरणे विविध माध्यमातून लोकांपर्यंत अन्य शाळांपर्यंत पोहचविली जातील. मराठी शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. पुर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश व वाढीव शुल्काविषयी आयुक्तांना आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------
शिक्षकांना देणार प्रशिक्षण
शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुदही करण्यात आली आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होईल - वर्षा गायकवाड.
---------