अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल
By admin | Published: August 4, 2016 04:39 AM2016-08-04T04:39:13+5:302016-08-04T04:39:13+5:30
अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल करून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निर्णय राखून ठेवला.
मुंबई : अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल करून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निर्णय राखून ठेवला. गेले चार दिवस स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. बुधवारी विरोधकांनी नियम २३ अन्वये चर्चा करण्याबाबत नोटीस दिली.
कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात, पण महाराष्ट्र अखंड राहील असे म्हणत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात शंका आहे, म्हणून या विषयावर सभागृहात चर्चा करावी अशी आमची विनंती आहे, असे त्यांनी सांगितले.
हाच मुद्दा जयंत पाटील, अजित पवार यांनी उचलून धरला. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर मल्लीनाथी केली आहे, म्हणून अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव दिला आहे. तसा ठराव झाला तर पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, असे अजित पवार व जयंत पाटील म्हणाले. त्यास हरकत घेत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा कामकाज पद्धतीनुसार तसा तो सभागृहात चर्चेला घेता येणार नसल्याचे सांगितले. असा कोणताही ठराव मांडायचा असेल तर संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत चर्चेला घ्यावा लागतो. त्यामुळे गटनेत्यांना बोलावून घेऊन अध्यक्षांनी चर्चा करावी असे मुनगंटीवार यांनी सुचविले.