१५ ज्युरींनी निवडले ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:13 AM2018-04-08T01:13:26+5:302018-04-08T01:13:26+5:30
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराच्या या वर्षीच्या पाचव्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या १५ नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे.
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराच्या या वर्षीच्या पाचव्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या १५ नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरुन दिलेली मते यांच्या आधारे तब्बल साडेतीन तास विचारांचे जोरदार मंथन पार पडले आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यासह सर्व ज्युरींनी विजेत्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले! येत्या मंगळवारी दि. १० एप्रिल रोजी मुंबईतील भव्य सोहळ्यात तेजाने तेजाची आरती होणार आहे..!
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेल्या १४ कॅटेगिरीतील नामांकने व लोकमतच्या वाचकांचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली आनंदाने पार पाडणाºया ज्युरी मंडळामध्ये केंद्रीयमनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आॅडिओ कॉन्फरन्सच्या साह्याने सहभागी झाले होते. टाटा कॅन्सर हाॅिस्पटलचे प्रख्यात आॅन्कोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, यूपीएलचे कार्यकारी संचालक विक्रम श्रॉफ, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष प्रसून जोशी, कलर्स - वायकॉम १८ चे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिक, तसेच अजय अतुल जोडीचे अजय गोगावले आणि अतुल गोगावले, नामवंत चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अय्याज मेमन यांची यावेळी उपस्थिती होती. न्यूज १८ नेटवर्कचे समूह संपादक राहूल जोशी मात्र त्यांच्या घरी झालेल्या दु:खद प्रसंगामुळे बैठकीस हजर राहू शकले नव्हते.
प्रकाश जावडेकर, पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. आनंद बंग जेव्हा त्यांचे मुद्दे मांडत होते, त्यावेळी अन्य ज्युरी सदस्यही विचारात पडत होते. अनेकांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा आणि बहुश्रुततेचा परिचय करुन दिला. उद्योग व्यवसायात आघाडीवर असणाºया यूपीएलचे विक्रम श्रॉफ यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील निरीक्षणे बैठकीत मोलाची भर टाकत होती. आपल्या अनुभवातून ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अय्याज मेमन यांनी पाचही नामांकनांची कारकीर्द ज्युरीसमोर उभी केली.
ज्युरी मीटिंग ठरली बौद्धिक मेजवानी
प्रत्येक कॅटेगिरीतील नामांकनांवर नेमकी कोणाची निवड करायची यावर जोरदार चर्चा झाल्या. प्रत्येकांनी आपापली मते सडेतोडपणे मांडली. काहीवेळा असे वाटू लागले की ज्युरी मंडळात देखील मतदानाचा कौल घ्यावा लागेल की काय? पण प्रत्येक जण अभ्यासू मते मांडत असल्याने सगळ्या विजेत्यांची निवड एकमताने होत गेली. दरवेळी जे नाव पुकारले जायचे, त्यावर सगळे ज्यूरी हात वरती करुन आपले मत नोंदवायचे. ही चर्चा आमच्यासाठी बौद्धिक मेजवानीच होती, असे मत नंतर ज्युरी सदस्यांनी नोंदवले.
ज्युरी आले होतेच तयारीने!
१४ कॅटेगिरीतील नामांकनांची फोटोसह माहिती देणारी पुस्तिका तयार करुन ज्युरींना बैठकीच्या आधीच पाठवण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आपापल्या नोंदी त्यावर करुन आणल्या होत्या. ज्युरींचा गृहपाठ मजबूत होता, हे होणाºया चर्चेतून स्पष्टपणे जाणवत होते. मराठी सिनेमा आणि नाटकांच्या नामांकनांवर चर्चा सुरु झाली, त्यावेळी
डॉ. राजेंद्र बडवे यांची निरीक्षणे उपस्थितांना आश्चर्यात टाकणारी होती. तर राज नायक यांची राजकीय निरीक्षणेही सर्वांना थक्क करणारी होती.
प्रत्येक जणच विजेता होता...!
सर्व १४ कॅटेगिरीतील नामांकने आणि व माहिती चर्चेला येत असताना, ज्युरींना त्यातील कोणाची निवड करावी, असा प्रश्न पडत होता. त्यामुळे बैठक संपताना आमच्या दृष्टीने तर सारेच विजेते आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण, राज नायक, डॉ. राजेंद्र बडवे यांनी बोलून दाखवले.
- महाराष्टÑाचा मानबिंदू असलेला ‘लोकमत’ चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: कानाकोपºयातून पोहोचलेला असल्यानेच अशी प्रकाशझोतापासून दूर राहिलेली कर्तबगार माणसे या पुरस्काराच्या नामांकनांसाठी शोधणे शक्य झाले. हे केवळ ‘लोकमत’लाच शक्य आहे, अशी भावना ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन विजय दर्डा यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी सर्व १४ कॅटेगिरीतील नामांकनांची माहिती ज्युरी मंडळाला सादर केली.
- संगीत दिग्दर्शक अजय अतुल आणि अन्नू मलिक यांच्यातील शब्दांची जुगलबंदी यावेळी उपस्थितांनी अनुभवली, तर प्रसून जोशी, डॉ. भालचंद्र मुणगेकर, रवि जाधव यांचे मोजकेच पण स्पष्ट बोलणे चर्चेला टोक आणणारे ठरले.