नवीन घर घेताय? नवीन घराची नोंदणी करताय? या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या
By सचिन लुंगसे | Published: January 27, 2023 10:44 AM2023-01-27T10:44:13+5:302023-01-27T10:44:46+5:30
महारेराकडून सुरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई: बहुतेक जण आयुष्यभराची कमाई पणास लावून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करीत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये म्हणून महारेराने अशा घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यात प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना ? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना ? घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना ? तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी,घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय ना ? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना ? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक आहे. घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी महारेराने ही मार्गदर्शक तत्वे नुकतीच जाहीर केलेली आहेत.
प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्या दृष्टीने अनेक अटींची पूर्तता करावी लागते. विकासकाकडे घर खरेदी, घर नोंदणीपोटी आलेली रक्कम इतरत्र खर्च न होता त्याच प्रकल्पावर खर्च व्हावी यासाठी रेरा नोंदणी क्रमांकनिहाय बँकेत खाते उघडावे लागते. त्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांपैकी 70 टक्के रक्कम या प्रकल्पाच्या कामासाठी या खात्यात ठेवावी लागते. विकासाकाला हे पैसे केव्हाही काढता येत नाहीत. त्यासाठी त्याला प्रकल्प अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांच्याकडून कामाच्या टक्केवारीचे आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र घेऊनच त्या प्रमाणात पैसे काढता येतात. शिवाय विकासकाला दर तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अध्ययावत करणे बंधनकारक आहे. यात प्रकल्पात काय काम चालू आहे, कसे काम चालू आहे, काम कुठपर्यंत आलेय या बाबी घरखरेदीदारांना घरबसल्या महारेराच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतात.
विकासकाला घर विक्री कराराआधी 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही. विकासक 10% पर्यंत रक्कम घेऊन घर नोंदणी घेत असेल/ घर विक्री करीत असेल तर विकासकाला घर विक्री करार करणे बंधनकारक आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे 1 जानेवारीपासून महारेराने नवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी विकासकासोबतच्या सर्व संचालकांचा दिन क्रमांक ( DIN ) याच्यासह या सर्वांच्या इतरही प्रकल्पाची सविस्तर माहिती या नवीन प्रकल्पाची नोंदणी करताना नोंदवणे आता बंधनकारक आहे. घर खरेदीदार या सर्व माहितीचा अभ्यास करून , त्या विकासकाच्या क्षमतेची चाचणी करून , सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकतात.
या सर्व प्रक्रियेत विकासकासोबत होणारा घर खरेदीकरार हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो. याबाबतही महारेराने आदर्श खरेदीकरार जाहीर केलेला आहे. त्यात दैवी आपत्ती , चटई क्षेत्र दोष दायित्व कालावधी आणि प्रकल्प हस्तांतरण करार या बाबी महारेरा कायद्यानुसार आवश्यक असून त्यात विकासकाला कुठलाही बदल करता येत नाही. याशिवाय आदर्श खरेदी करारात खरेदीदाराच्या संमतीने काही बदल करायचे असल्यास विकासक ते करू शकतात. परंतु खरेदीदाराला ते स्पष्टपणे कळावे यासाठी ते बदल अधोरेखित ( Underline) करणे बंधनकारक केलेले आहे. या करारातच हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची नोंद असते. त्याची नोंद त्यांना महारेराच्या संकेतस्थळावरही करावी लागते. ज्यांच्या मार्फत आपण हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेराकडे नोंदणीकृत आहेत किंवा नाही, याचीही खात्री गुंतवणूकदाराने करून घ्यायला हवी. महारेराने ठरवून दिलेल्या या सर्व 5 बाबींची काळजी घेऊन गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक सुरक्षित राहायला नक्की मदत होणार आहे.
सुरक्षित घर खरेदी / घर नोंदणीसाठी महारेराची पंचसूत्री
- फक्त महारेराकडील नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक
- महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक
- महारेराने ठरवून दिलेल्या "आदर्श घर खरेदी करारानुसारच" करार
- 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर नोंदणी /घर खरेदी करत असाल तर विकासकाला घरविक्री करार करणे बंधनकारक
- महारेराकडे नोंदणीकृत मध्यस्था मार्फतच जागेचा व्यवहार
महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- आर्थिक शिस्त: घर खरेदी/ घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांपैकी 70 टक्के बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक
- पारदर्शकता : प्रकल्पाची सविस्तर माहिती महारेरा संकेतस्थळावर
- प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्याला महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे विकासकाला बंधनकारक
- प्रकल्पात मोठी वाढ किंवा फेरफार करण्यासाठी 2/3 घर खरेदीदारांची संमती आवश्यक
- प्रकल्पासंबंधी तक्रार असल्यास महारेराकडे दाद मागण्याची सोय
- महारेराच्या संकेतस्थळामार्फत घरबसल्या प्रकल्पाचे संनियंत्रण(Monitoring)शक्य
- सर्व व्यवहारांसाठी महारेराने ठरवून दिलेल्या चटई क्षेत्राचाच आधार