Maharshtra Day: मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत करून त्यांना वाचवण्यासाठी देशभर चळवळ उभारणारा अवलिया डॉक्टर..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:30 AM2018-05-01T07:30:00+5:302018-05-01T07:30:00+5:30
जगात जेवढी युद्ध झाली आणि त्यात जेवढे लोक मृत्युमुखी पड्ले त्यांच्या त्यांच्या कैकपटीने भारतासारख्या देशात मुलगा हवाच या हट्टापायी मुलींच्या हत्त्या झाल्या आहेत. स्त्री-भ्रूण हत्यांच्या देशातल्या घटना विचारात घेतल्या,तर जगातील सर्वात मोठं हत्याकांड भारतात घडत आहे.
आपल्या रुग्णालयात मुलगी जन्माला आली की बिल माफ करुन तिचे सर्वांना पेढे वाटून स्वागत करण्याच्या या समाजसेवेला सुरुवातीला डॉ. राख यांच्या घरातून मोठा विरोध झाला. दुष्काळाने होरपळून निघाल्याने अत्यंत कष्टाने जगलेल्या या कुटुंबाला गणेश राख यांच्या प्रॅक्टिसमुळे बरे दिवस बघण्याचं स्वप्न पडू लागलं होत. त्यात मोफत समाजसेवा त्यांना वेडेपणा वाटू लागला. त्यामुळे घरातून प्रचंड विरोध झाला. तेव्हा गणेश यांचे वडील त्यांच्या ठामपणे पाठीशी उभे राहिले. त्यांनी घरातल्या सदस्यांची रीतसर बैठक घेतली आणि गणेश जे काही करतो आहे, ते खूप मोलाचे काम आहे. तेव्हा ते त्याला करू द्या. गरज पडली तर मी पुन्हा हमाली करतो, पण गणेशला त्याचं काम करू द्या, असे ठणकावून सांगितले. म्हणून डॉ. राख आपले काम करू शकले आणि इतरांनाही त्यांनी या कामात सामावून घेऊ शकले.त्यासाठी आपले हॉस्पिटल सोडून ते देशभर फिरले म्हणूनच आज देशातले 40 हजारांहून अधिक डॉक्टर्स मुलींच्या जन्माचे स्वागत बिल माफीसह पेढे वाटून करू लागले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मुलांच्या बरोबरीने मुलींची संख्या वाढलेली पाहायला मिळेल अशी आशा डॉ.राख व्यक्त करतात.
हडपसरसारख्या विकसित होणाऱ्या परिसरात त्याना 200 खाटांचे मोठं रुग्णालय उभारायचे होते. परंतु या कामामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. उलट 50 खाटांचे रुग्णालय चालवतानाच त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यांनी आहे त्याच रुग्णालयात 10 खाटा कमी केल्या. खरं तर हे लौकिकार्थानं शहाणपणाचं लक्षण नाही. डॉ. राख ज्या परिस्थितीतून पुढं आले, ज्या वातावरणात वाढले, ती पाहिली तर लोकांनी त्यांना या कामासाठी वेड ठरवणं साहजिकच होतं. सोलापूर जिल्यातल्या करमाळा तालुक्यातील वंजारवाडी हे डॉ. गणेश राख यांचं जन्मगाव. दुष्काळ पाचवीलाच पुजला असल्याने गावातले बहुतांश लोक पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहरांमध्ये जात होते. त्याच लाटेत डॉ. गणेश राख यांचे वडील 1985 मध्ये पुण्यात आले. वडील हमाली करायचे आई धुणीभांडी करून संसाराला हातभार लावायची.
डॉ. राख सांगतात, शाळकरी वयात कुस्ती ही माझी पॅशन बनली होती. त्याला वडीलांचाही पाठिंबा असायचा पण आईने कडाडून विरोध केला ती म्हणायची ''कुस्तीच्या मोहापायी तुला पोसणं आमच्यानी जमणार नाय. घरात शिजवलेले अन्न तू एकटाच फस्त करतोय, त्यासाठी आम्हाला किती घाम गाळावा लागतंय ते जरा बग. बापाबरोबर एक महिना हमलीचं काम कर म्हणजे तुला समजेल.'' एका उन्हाळाच्या सुट्टीत मी खरोखरच वडिलांसोबत गेलो माणसाला जगण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागत हे मी मार्केटयार्डात हमाली काम करताना घेतला त्यांनी माझे डोळे उघडले आणि मी अभ्यासाला लागलो. सातवीपर्यंत मला अभ्यास, शाळा आणि शिक्षण या गोष्टी मला नकोशा वाटत होत्या पण आठवी नंतर मी सतत मेरिटमध्ये असायचो.
१२ च्या गुणपत्रिकेवर गणेश राख याना इंजिनीरिंगला सहज प्रवेश मिळत होता पण त्यानंतर आपल्याला नोकरी कोण लावणार? व्यवसाय करायचा तर भांडवल नाही तेव्हा डॉक्टर व्हावं आणि गावाकडं जाऊन प्रॅक्टीस करावी म्हणून ते मेडिकलला गेले टिळक आयुर्वेद कॉलेजमधून ते डॉक्टर झाले. तेव्हा आपल्याला समाजसेवा करायची आहे असे कुठेही त्यांच्या मनात नव्हतं. गावी जाऊन छोटा दवाखाना टाकावा आणि जमेल तसे पैसे मिळवून कुटुंबाला आधार द्यावा या विचाराने ते गावी गेले पण गावात सारंच ओस पडलेलं होतं घरातली म्हातारी माणसं, बायका-पोरं सोडली, तर सारा गाव शहरात गेला होता म्हणून ते पुन्हा पुण्यात आले आणि हडपसर परिसरात त्यांनी आपला दवाखाना सुरु केला. ते सांगतात इथं वंश वाढण्यासाठी एक तरी मुलगा हवाच या हट्टापायी मुलीला जन्माआधीच मारण्याची मानसिकता अद्याप प्रबळ करताना पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये मात्र मुलगी जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो.
विशेष म्हणजे या आनंदोत्सवात मुलीच्या पालकांसह सारे नातेवाईक स्वखुशीने सहभागी होतात. मुलीला सन्मान मिळवून देण्यासाठी प्राणपणाने झटतात. अत्यंत छोट्याशा कृतीतून डॉ. गणेश राख यांनी हा बदल घडवून आणला आहे. इतकंच नाही, तर मुलगी वाचवणारी कृतिशील चळवळ उभारत त्यांनी देशभरातील हजारो डॉक्टरांना आपल्या या उपक्रमाशी जोडून घेतलं आहे. वैद्यकीय व्यवसायाला नैतिकतेचं अधिष्ठान प्राप्त करून देण्याबरोबरच माणुसकीचा नवा चेहरा समाजासमोर ठेवणाऱ्या डॉ. गणेश राख यांच्या प्रयत्नांविषयी मुलींना वाचवणारी कृतिशील चळवळ उभारणारा महानायक. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा दिलेला आहे. त्याला बळ देण्याची भूमिका घेत धर्मादाय रुग्णालयांनी मुलीचा जन्म झाल्यास दवाखान्याच्या बिलात सवलत द्यावी आणि मातेचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करावा असा ठराव पुण्यातल्या धर्मादाय कार्यालयाने नुकताच घेतला आहे. पुण्यातल्या ५६ धर्मदाय रुग्णालयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अर्थात याच सारं श्रेय जात ते पुण्यातल्याच मेडिकेअर हॉस्पिटल फाऊंडेशनच्या डॉ. गणेश राख यांच्याकडे. सुरुवातीला ही बाब कोणाच्याच पचनी पडली नाही. मित्रांनी, नातेवाईकांनी, कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांना या त्यांच्या कृत्याबद्धल वेड्यात काढलं, परंतु डॉक्टरांनी घेतला वसा टाकला नाही. आता लोक मुलगी झाली तर तिच्या जन्माचं स्वागत धुमधडाक्यात करू लागले आहेत. मुलगा व्हावा म्हणून वाटेल ते करणारे लोक आज मुलगी जन्माला आल्या नंतर तिचा आनंदाने स्वीकार करू लागले आहेत.
डॉक्टर राख सांगतात, लोक बदलतात, कारण तेही शेवटी माणसचं आहेत. गरज असते ती सातत्य पूर्ण प्रयत्नांची. मी गेली सहा वर्षे माझ्या रुग्णालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहे. या सहा वर्षात माझ्याकडे 1146 मुली जन्माला आल्या. त्या प्रत्येकीच्या जन्माचा आम्ही रुग्णालयात आनंदोत्सव साजरा केला. अर्थात हे काम आता हडपसर परिसारपूरते मर्यादित राहिलेलं नाही. ते तालुक्या-तालुक्यात पोहोचलं आहे. डॉक्टर्सच नव्हे तर औषध विक्रेत्यापासून मोठमोठ्या संस्थांपर्यंत अनेक जण या चळवळीचा भाग बनले आहेत. नव्यानं अनेक लोक त्यात सहभागी होत आहेत. प्रॅक्टिस सुरु केल्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.
जगात जेवढी युद्ध झाली आणि त्यात जेवढे लोक मृत्युमुखी पड्ले त्यांच्या त्यांच्या कैकपटीने भारतासारख्या देशात मुलगा हवाच या हट्टापायी मुलींच्या हत्त्या झाल्या आहेत. स्त्री-भ्रूण हत्यांच्या देशातल्या घटना विचारात घेतल्या,तर जगातील सर्वात मोठं हत्याकांड भारतात घडत आहे. हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे ते रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलींचा सन्मान होणं, तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क बहाल करणं गरजेचं आहे. सामाजिक पर्यावरणाचा दृष्टीनेही हे महत्वाचं आहे. त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने मुलीच्या जन्मासाठी तिच्या वाढीसाठी आणि शिक्षणासह तिच्या उज्वल भविष्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही त्याची सुरुवात केली आहे. तुम्हीही त्यात सामील व्हा.