महात्मा गांधींची हत्या ही गोडसेंची चूक
By admin | Published: May 21, 2017 01:58 AM2017-05-21T01:58:56+5:302017-05-21T01:58:56+5:30
नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले. अखंड भारताच्या विभाजनापासून अनेक समस्यांचे मूळ गांधी नव्हे तर पं. जवाहरलाल नेहरु होते व गोडसे यांना याचे आकलन न झाल्याने त्यांनी मूळावर घाव घातला नाही, असा दावाही जोशी यांनी केला.
अखंड भारताचे विभाजन करण्यामागे पं. जवाहरलाल नेहरु यांना गोवळलकर गुरुजींची साथ होती. त्यामुळेच १९४६ ला हिंदू महासभा पराभूत झाली. नेहरु हे सत्तापिपासू होते व म. गांधी यांना पुढे करुन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केले. हे त्या वेळच्या पत्रव्यवहारांवरुन स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.
रत्नागिरीत १९२६ मध्ये स्वा. सावरकर आणि गांधींची भेट झाली तेव्हा सावरकरांनी गांधीजींना ‘महात्मा’ अशी उपाधी दिली. तोपर्यंत त्यांना कोणीही ‘महात्मा’ म्हटले नव्हते. रोलॅक्ट अॅक्ट हा काळा कायदा आला तेव्हा त्यास विरोध करताना महात्मा गांधी हे १९२० पर्यंत हिंदुमहासभेसोबतच होते, तेव्हा त्यांनी त्या कायद्याविरोधात राष्ट्रीय जनजागरण केले होते. तसेच चंपारण्य आंदोलनाध्येही ते महासभेसोबतच होते, असे जोशी म्हणाले.
जवाहरलाल नेहरु यांनी के.आर. दास यांच्या सहकार्याने गांधींवर दबाव आणून त्यांना बाजूला केले व हिंदू महासभेचे प्रमुख विरोधक म्हणून पुढे आणले. गोवळलकर गुरुजींची साथ नेहरुंना नसती तर त्याकाळात काँग्रेस सत्तेत आलीच नसती, असेही जोशी यांचे म्हणणे होते.
कल्याणमध्येही नथुरामचे स्मारक
कल्याणपासून ६ किमी अंतरावर असलेल्या सापाड गावात नथुराम गोडसेंचे स्मारक उभारण्यात येत आहे. एकूण ३ गुंठ्यांच्या जागेत ८ बाय ६ च्या खोलीत गोडसेंची मूर्ती बसवण्यात येणार असून अन्य जागेत गोशाळा, वाचनालय आणि जोशी कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. यासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी कोणाकडूनही जमा करणार नाही. गोडसेंची ३ टन वजनाची मूर्ती राजस्थानमधील किसनगढ येथे तयार होत असून केवळ दळणवळणाच्या काही अडचणी आहेत, त्या मार्गी लागल्या की, वर्षभरात हे स्मारक पूर्ण होईल, असे जोशी म्हणाले. देशभरात गोडसेंची सध्या दोन ठिकाणी स्मारके असून एक दिल्लीत, तर दुसरे मेरठ येथे आहे. आता हे तिसरे सापडमध्ये असेल असा दावा जोशी यांनी केला.