"महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा", नारायण राणेंनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 01:37 PM2022-06-12T13:37:58+5:302022-06-12T13:38:45+5:30
Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे Uddhav Thackeray यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी Narayan Rane यांनी केली आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या आत्मविश्वासाने संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार दिला होता. मात्र पवार यांच्या परावभवामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांची नाचक्की झाली आहे. ते स्वत:चे आमदारही वाचवू शकले नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमुक आहोत. जी भाषा वापरायला नको होती ती वापरली. मी त्या भाषेचा उल्लेख करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. तसेच बेअब्रू झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव समजतो.
राज्यसभा निवडणुकीत तीन जागा जिंकणार, असे शिवसेना सांगत होती. शेवटी काय झालं. संजय राऊत एका मताने निवडून आले. थोडक्यात वाचले आमच्या हातातून. एकूणच सत्तेत असलेल्या आघाडीची मतं यांना मिळाली पाहिजे होती. पण तेवढी ती मिळाली नाही. उद्धव ठाकरेजी सत्ता राखण्यासाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या.नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेलंत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांचं नातंही तुम्ही धुळीला मिळवलंत. म्हणून तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
तुमचे ८-९ आमदार फुटतात. तुमच्याबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. आम्ही विरोधात असूनही आमदारांना एकत्र ठेवलं. मात्र तु्म्हाला ते जमलं नाही. शरद पवारांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली. त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण तुमच्याकडून तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.