राज्यातील महविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 03:13 PM2021-01-23T15:13:44+5:302021-01-23T15:14:35+5:30
राज्य सरकारने समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे.
पुणे : महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने करायला हवेत. आज या घडीला राज्याच्या वसतीगृहातील अवस्था भीषण आहे. वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येतात मात्र त्यातही सावळा गोंधळ सुरू आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही जणांनी सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळवला आहे. पण सरकारला या सर्व विषयांबद्दल काही एक देणेघेणे पडलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भोसरी येथे जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले; ठाकरे सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याचे सरकार मालखाऊ : देवेंद्र फडणवीस
आमच्या सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचे सरकार घालत आहेत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करीत होतो. मात्र, सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी कडवट टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याणकारी योजना बंद करणारे तुम्ही कोण, असा जाब सरकारला विचारणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल, अशी पुष्टी फडणवीस यांनी जोडली.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष...
महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. दोन जणांसाठी असलेल्या कोचवर तिघे बसले आहेत. या तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. निवडणुकीत तिघे एकत्र आले तर काय होईल? असा प्रश्न विचारण्यात येत होते. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधक आम्हीच मोठा विजय मिळविल्याचा करीत असलेला दावा खोटा आहे असेही फडणवीस म्हणाले.