राज्यात महाविकास आघाडीची ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित- छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:59 PM2023-01-26T18:59:50+5:302023-01-26T19:00:59+5:30
'मविआ'च्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करण्याचे केले आवाहन
नाशिक: राज्यात ताकद महाविकास आघाडीची असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी एकजुटीने काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
"शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महील्या उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तो पर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी. उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा," असे सूचक विधान भुजबळांनी केले.