महाविकास आघाडीच ओबीसी हिताची मारेकरी; फडणवीस यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:57 AM2021-10-21T06:57:27+5:302021-10-21T06:57:49+5:30
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
ठाणे : सध्याचे सरकार हे ओबीसी विरोधी आहे. ओबीसींच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जात नाही. ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीच असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.
भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीने येथे आयोजित ओबीसी जागर अभियानामध्ये ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
१५ डिसेंबर २०१९ रोजी नवीन सरकारच्या काळात आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागास आयोग स्थापन करा, असे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात आठ वेळा सुनावणी होऊनही त्याची माहिती सध्याच्या सरकारने दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ५ मार्च २०२१ रोजी राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हे सरकार आंदोलन करत बसले, आता तब्बल १५ महिन्यांनंतर या सरकारने अध्यादेश काढला आहे. ओबीसींचा चुकीचा तपशील केंद्राकडे सादर करण्यात आला होता. केंद्राने त्यानुसार चुकीची माहिती आल्याचे सांगत वेळ वाढवून मागितली होती. किमान माहिती तरी योग्य पद्धतीने दिली असती तर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.
’मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवारच करतात’
जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यांच्यात मी मुख्यमंत्री असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच काम नाही. त्यांचे काम शरद पवारच करतात, असा टोला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.