ओबीसी आरक्षणाचा खून ‘मविआ’ने केला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 05:39 AM2022-05-08T05:39:47+5:302022-05-08T05:40:03+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीत ओबीसी नेते फ्लॉवरपॉटसारखे; भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.

Mahavikas aghadi kills OBC reservation; Allegation of Devendra Fadnavis | ओबीसी आरक्षणाचा खून ‘मविआ’ने केला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

ओबीसी आरक्षणाचा खून ‘मविआ’ने केला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओबीसींचे आरक्षण हे गेले नसून त्याचा महाविकास आघाडी सरकारने खून केला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ओबीसी नेत्यांची परिस्थिती शोभेच्या फ्लॉवरपॉटसारखी असते. एखादाच नेता मोठा केला जातो अन् त्याच्या भरवश्यावर दुकानदारी चालविली जाते, अशी तोफही त्यांनी डागली.  

भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर,  उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत ओबीसी आरक्षण मिळाले नाही तरी ओबीसींना भाजप २७ टक्के तिकिटे देईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
भाजपच्या डीएनएतच ओबीसी आहे. ओबीसींच्या विश्वासावर आम्ही मोठे झालो. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये ओबीसी नेते असले तरी त्यांच्या पक्षांच्या मालकांना ओबीसींचे हित नको आहे. कारण, त्या मालकांचे राजकारण ओबीसींच्या भरवश्यावर नाही.  महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

...मग केंद्राच्या हाती द्या
यांच्यातील कोणीतरी उठतो आणि सांगतो ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, द्या केंद्र सरकारच्या हातात द्या. ते सरकार चालवूनही दाखवेल आणि करूनही दाखवेल. तुम्हांला इथे वसुली करण्यासाठी निवडून दिले आहे का? असा खोचक सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.

आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच : पटोलेंचा पलटवार
ओबीसींबाबत भाजपचे प्रेम हे पुतना मावशीचे असल्याची टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे आरक्षण घालविण्यासाठी भाजप व देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची टीका केली. 
फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, आरक्षण संपविणे हा भाजप व रा. स्व. संघाचा अजेंडा आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात तेच झाले.   मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही. आमच्यावर खापर फोडून भाजप ओबीसींवरील अन्यायाच्या पापातून मुक्त होवू शकत नाही. मंडल आयोगाने ओबीसींना दिलेल्या २७ टक्के आरक्षणाचा त्यावेळी भाजपनेच विरोध केला होता, असा दावाही पटोले यांनी केला.

Web Title: Mahavikas aghadi kills OBC reservation; Allegation of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.