निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:45 AM2024-08-17T07:45:16+5:302024-08-17T07:46:27+5:30

आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची मविआची टीका

Mahavikas Aghadi leaders angry over election commission not announcing election dates in Maharashtra | निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी संतप्त झाली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून थेट निवडणूक आयोगालाच लक्ष्य करण्यात आले आहे. आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची टीका मविआच्या नेत्यांनी केली आहे.

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्याचे आव्हान दिले तर नेते आदित्य ठाकरे यांनीही आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, एक राष्ट्र एक निवडणूक हा मुद्दा केवळ चर्चेसाठी आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे कारण म्हणून ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद करते. महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे त्यांनी दिलेले आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस.

आयोगाच्या म्हणण्यानुसार फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे, देशातील इतर राज्यांमध्ये नाही?, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करताना राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याने सरकार निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केला.  महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि विधानसभा निवडणुकीत ते महायुतीला नाकारतील, असा दावा त्यांनी केला. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये  निवडणुका घेण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याने दिवाळीनंतरच निवडणुका होतील, असा टोला लगावला.

Web Title: Mahavikas Aghadi leaders angry over election commission not announcing election dates in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.