महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:03 AM2024-10-14T07:03:09+5:302024-10-14T07:04:16+5:30
महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल.
मुंबई : महायुती सरकारच्या कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँड्स एंडमध्ये मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे आदीं उपस्थित होते.
महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल.
बाबा सिद्दीकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? या राज्यात महिला असुरक्षित, सत्ताधारी पक्षाचे नेते असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय? असा सवाल ठाकरे यांनी केला.
महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच मविआचे लक्ष्य आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
‘गद्दारांचा पंचनामा’मध्ये काय? -
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवू या
- शाहू फुले आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गद्दारांना महाराष्ट्रातून हद्दपार करू या
- महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार लेके बाळी सुरक्षित नाही हे महायुतीचे महापाप, चला त्यांना धडा शिकवू या
- शेतमालाला हमीभाव आणि पिक विमाही मिळत नाही
- शेती अवजारांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू या
- महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळून युवकांचा रोजगार हिरावून घेणाऱ्यांना जागा दाखवू या
- प्रत्येक कामात ३० टक्के कमिशन घेणाऱ्या सत्ताधारी खोकेबाजांचे पितळ उघडे करू या
- जाती-धर्मात भांडण लावून दंगली घडवणाऱ्या महाराष्ट्र अस्थिर करणाऱ्या सरकारला तडीपार करू या
- महायुती सरकारमधील कथित रेट कार्ड : आमदार ५० कोटी, नगरसेवक १ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली १ कोटी, जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली २५ लाख असे विविध दर असल्याचा आरोप, या पंचनाम्यात महायुती सरकारमधील कथित घोटाळ्यांचीही यादी देण्यात आली आहे.